Turkey Earthquake: तुर्की पुन्हा भूकंपाने हादरलं; तीव्रता ६.४ रिश्टर स्केल, काही इमारती जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:58 PM2023-02-20T23:58:26+5:302023-02-21T00:01:03+5:30
Turkey Earthquake: तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.
Turkey Earthquake: अलीकडेच झालेल्या मोठ्या भूकंपानंतर आता कुठेतरी तुर्की सावरत असतानाच पुन्हा एकदा तुर्कीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणावल्याची माहिती देण्यात आली आहे. तुर्कीतील पुन्हा एकदा झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे काही इमारती कोसळ्याची माहिती असून, मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तुर्की आणि सीरिया सीमेवरील भागात हा भूकंप झाल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच झालेल्या भूकंपात तुर्कीतील सुमारे ४७ हजार जण ठार झाले. तर दहा लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. यापूर्वी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल होती. सोमवारी पुन्हा एकदा तुर्कीत भूकंपाचे धक्के बसले. दक्षिण तुर्कीतील अंताक्य भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अंताक्यामधील भूकंपानंतर अधिक इमारती कोसळल्या
पुन्हा झालेल्या भूकंपामुळे दक्षिण तुर्कीमध्ये आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे १० सेकंद भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यावेळी लोक हॉटेलमधून बाहेर आले आणि बाहेरील मोकळ्या जागी जमा झाले. अंताक्यामधील भूकंपानंतर अधिक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य करणाऱ्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनही सतर्क झाले आहे. या भूकंपानंतर अनेकांनी मोकळ्या जागेचा आसरा घेतला. तूर्तास तरी कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"