तुर्कीने हात झटकले! हमासच्या प्रमुखाला देश सोडण्यास सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:59 PM2023-10-23T17:59:54+5:302023-10-23T18:00:38+5:30
सात ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ले केले तेव्हा हानिया हा तुर्कीमध्येच होता. इस्माईल हानिया हा हमासचा प्रमुख आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट आली आहे. युद्ध सुरु झाल्यावर दहशतवाद्यांना गाझामध्ये लढण्यास ठेवून हमासचा प्रमुख तुर्कीमध्ये सुरक्षित ठिकाणी गेला होता. त्याला आपला देश सोडण्याचे आदेश तुर्कीने दिले आहेत. पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीने जगाशी वैर नको म्हणून हात वर केले आहेत.
हमासचा पॉलिटिकल ब्युरोचा प्रमुख इस्माईल हानिया आणि त्याच्या साथीदारांना तुर्की सोडण्यास सांगितले आहे. इस्माइल हानिया हा त्याच्या कुटुंबासह गेल्या काही काळापासून कतरच्या दोहामध्ये राहत असल्याचे सांगितले जात होते. परंतू, आता तो तुर्कीला असल्याचे सांगितले आहे.
सात ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ले केले तेव्हा हानिया हा तुर्कीमध्येच होता. इस्माईल हानिया हा हमासचा प्रमुख आहे. गाझा पट्टीतील निर्वासित शिबिरात जन्मलेल्या हानियाने शिकत असतानाच हमासमध्ये प्रवेश केला होता. 2006 मध्ये हानिया पॅलेस्टाईनचा पंतप्रधान झाला. अनेक वर्षांपूर्वी तो गाझा पट्टीतून पळून कतारला आला होता.
हमास ही पॅलेस्टाईनची इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1987 मध्ये झाली. इस्माईल हानिया त्याचा नेता आहे. इस्रायलशिवाय अमेरिकेसह अनेक देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. 2007 पासून गाझा पट्टीवर हमासचे वर्चस्व आहे. हमास अनेक वर्षांपासून इस्रायलवर हल्ले करत आहे. परंतू, यावेळचा हल्ला हा खूपच मोठा होता.