तुर्की, सिरिया भूकंपाने उद्ध्वस्त! 2,650 वर ठार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती, हजारो गाडले गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:05 AM2023-02-07T06:05:54+5:302023-02-07T06:09:41+5:30
लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु तेथे नुकसानीचे वृत्त नाही.
अंकारा : गाढ झोपेत असताना धरणी हलली... पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या.. एक-दोन नव्हे तर शेकडो इमारती भुईसपाट झाल्या. हजारो जण गाडले गेले अन् २,६५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आग्नेय तुर्की आणि सिरियात सोमवारी पहाटे भूकंपाने हाहाकार माजला. शक्तिशाली ७.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने दोन्ही देश हादरले. तुर्कीत किमान १,६५१ जणांचा, तर सिरियात १००० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु तेथे नुकसानीचे वृत्त नाही. तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओकटायस अर्दोगान यांनी १९३९ नंतरचा हा सर्वात संहारक भूकंप असल्याचे सांगितले. बचावकर्ते अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा बाधित भागात शोध घेत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
२,८१८ पेक्षा अधिक इमारती तुर्कीत कोसळल्या -
कैरोपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा केंद्रबिंदू सिरियाच्या सीमेपासून ९० किमी अंतरावर असलेल्या गाझियानटेप शहराच्या उत्तरेला होता. तुर्कीमध्ये ३० मिनिटांत भूकंपाचे तीन मोठे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता हा भूकंप झाला.
६.७ तीव्रतेचा दुसरा धक्का ११ मिनिटांनी आला. ५.६ रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप १९ मिनिटांनी झाला. भूकंपानंतर सुमारे २० धक्के जाणवले, त्यापैकी सर्वात शक्तिशाली ६.६ तीव्रतेचा होता. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचे वृत्त आहे.
मृत आकडा १० हजारांपर्यंत जाणार?
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार (यूएसजीएस) भूकंपाचा केंद्र गाझिआनटेपपासून ३३ किमी अंतरावर १८ किमी खोलीवर होता. हा भूकंप अशावेळी झाला जेव्हा पश्चिम आशिया बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात आहे. यूएसजीएसनुसार ‘तुर्कीमध्ये मृतांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली असून ती १० हजारांपर्यंत पोहोचू शकते.
भारत तुर्की, सिरियाच्या पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्की आणि सिरियातील भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करीत भारत या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. आग्नेय तुर्कीला नवीन शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला