तुर्कस्थान, सिरिया भूकंप : अबब... ११,००० मृत्यू; आरोग्यसेवा तोकडी, औषधांचाही तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:18 AM2023-02-09T06:18:41+5:302023-02-09T06:24:39+5:30
भूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत.
अंकारा : तुर्कस्थान, सिरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ११ हजारांवर पोहोचली आहेत. त्यात तुर्कस्थानातील ८५०० मृतांचा समावेश आहे. भूकंप झालेल्या भागांची तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एद्रोगन यांनी पाहणी केली, तसेच तेथील मदतकार्याचा वेग वाढविण्याचे आदेश दिले. दोन्ही देशांत उपचारांसाठी आरोग्यसेवा तोकड्या पडल्या असून औषधांचाही तुटवडा आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांनी वैद्यकीय मदत व जीवनावश्यक वस्तू तुर्कस्थान, सिरियामध्ये रवाना केल्या.
रोगराईचा धोका
भूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत. कोसळलेल्या हजारो इमारतींचे ढिगारे वेळीच उपसण्यात आले नाहीत, तर त्याखालील मृतदेह कुजून रोगराई पसरण्याचा धोका असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.
‘कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’
तुर्कस्थानमधील सर्व नागरिकांना आम्ही योग्य निवारा पुरविणार आहोत. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे एद्रोगन यांनी म्हटले आहे. तुर्कस्थानमधील हातय प्रांतातील भूकंपग्रस्त शहरांचा एद्रोगन यांनी दौरा केला. या देशापेक्षा सिरियातील परिस्थिती भीषण आहे.