तुर्कीत सहा हजार जण ताब्यात
By Admin | Published: July 18, 2016 06:04 AM2016-07-18T06:04:41+5:302016-07-18T06:04:41+5:30
सरकार उलथून पाडण्याचा हेतू असल्याबद्दल तुर्कस्तानने सुमारे ६ हजार जणांना ताब्यात घेतले आहे.
इस्तंबुल : सरकार उलथून पाडण्याचा हेतू असल्याबद्दल तुर्कस्तानने सुमारे ६ हजार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी लोकांना ताब्यात घेतले जाईल, असे न्याय मंत्री बेकीर बोझडॅग यांनी रविवारी सांगितले. बंड मोडून काढण्याचे काम सध्या सुरू आहे, असे बोझडॅग म्हणाल्याचे ‘अनादोलू’ या सरकारी वृत्तसेवेने म्हटले.
तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी अत्यंत कठोरपणे राबविलेल्या मोहिमेमध्ये कित्येक डझन वरिष्ठ लष्करी अधिकारी व न्यायमुर्तींना ताब्यात घेतले. अध्यक्ष रिसेप तय्यीप यांना ईर्डोगॉन यांना पदच्युत करण्याच्या हेतुने झालेल्या या बंडाचा धिक्कार करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यांवर उतरल्यानंतर ही स्थानबद्धतेची कारवाई झाली. या बंडांचा निषेध अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जागतिक नेत्यांनी करून आता यानंतर ‘कायद्याच्या राज्याचा’ सन्मान राखा, असेही आवाहन इर्डोगॉन यांना केले. बंडाचा कट रचणाऱ्यांपैकी काहींना अटक झाल्यानंतर आडदांड वागणूक दिल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर वरील सल्ला देण्यात आला. सरकारने दिलेल्या माहितीनुसार इस्तंबुल आणि अंकारा येथील महत्वाची ठिकाणे लष्करातील एका गटाने कब्ज्यात घेऊन सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिक आणि सैनिक असे १६१ जण ठार झाले तसेच हे बंड करणारे १०० पेक्षा जास्त सैनिकही जणही प्राण गमावून बसले, असे लष्कराने सांगितले.
>आठ जण ग्रीसमध्ये
तुर्कीचे लष्करी हेलिकॉप्टर उत्तर ग्रीसमध्ये उतरले असून त्यातील कर्मचाऱ्यांनी राजकीय आश्रयाची मागणी केली आहे. फसलेल्या बंडात या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
>युरोपियन युनियनला दिलासा
बंड फसल्यामुळे युरोपियन नेत्यांनी सुटकेचा श्वास घेतला. बंड फसल्यामुळे संभाव्य गोंधळ टळला आणि त्याने स्थलांतरितांच्या संकटावर मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली.