ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:18 AM2019-05-27T05:18:57+5:302019-05-27T05:19:06+5:30
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन, आरोग्य मंत्री मॅट हॅनॉक, रोरी स्टुअर्ट आणि एस्टर मॅके यांच्यासह बारा नेत्यांची नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर संसदेतील सर्व खासदारांची संमती मिळवण्यासाठी नव्या पंतप्रधानांना कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यासह सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करावी अशी मागणी लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्यासह अन्य काही नेत्यांनी केली आहे.
युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या कौल ब्रिटनमधील ५२ टक्के जनतेने ३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या सार्वमतात दिला होता. त्यानुसार ब्रेक्झिटची प्रक्रिया एव्हाना पार पडायला हवी होती. मात्र त्यात प्रचंड अडचणी येत असल्याने नाराज झालेल्या थेरेसा मे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले आहे. नवीन पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहातील.
ब्रेक्झिट कराराबाबत थेरेसा मे यांनी आजवर सादर केलेले तीनही प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेने फेटाळून लावले आहेत. ब्रेक्झिटसंदर्भात ब्रिटनला आता वेगळा पर्याय शोधावा लागेल असेही त्यांनी एका भाषणात म्हटले होते.