या शहरात जन्माला येतात जुळी मुलं !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:59 AM2022-10-21T10:59:43+5:302022-10-21T11:03:15+5:30

प्रत्येक शहराचं एक वैशिष्ट्य असतं. त्या त्या शहराला त्याचा अभिमानही असतो आणि आपल्या त्याच वैशिष्ट्यामुळे ते लोकांमध्ये प्रसिद्धही असतं.

Twins born in town of Igbo Ora | या शहरात जन्माला येतात जुळी मुलं !

या शहरात जन्माला येतात जुळी मुलं !

Next

प्रत्येक शहराचं एक वैशिष्ट्य असतं. त्या त्या शहराला त्याचा अभिमानही असतो आणि आपल्या त्याच वैशिष्ट्यामुळे ते लोकांमध्ये प्रसिद्धही असतं. आपल्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं हे वलय कायम राहावं यासाठी त्या शहरातील लोक, लोकप्रतिनिधी आणि शासनही प्रयत्न करीत असतं; कारण प्रसिद्धीच्या याच झोतामुळे पर्यटकांचा ओढा त्या-त्या शहरात वाढतो, त्या शहरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते, अनेक हातांना रोजगार मिळतो.

भारतातलंच उदाहरण घेतलं तर जयपूर हे ‘पिंक सिटी’ म्हणून, जोधपूर हे ब्लू सिटी किंवा सन सिटी, भोपाळ आणि उदयपूर ही तलावांची शहरं, तर अहमदाबाद हे ‘मँचेस्टर ऑफ इंडिया’, ‘बोस्टन ऑफ इंडिया’ किंवा ‘इंडियाज फर्स्ट वर्ल्ड हेरिटेज सिटी’ म्हणून ओळखलं जातं. या सगळ्या नामाभिधानांचा त्या-त्या शहरांना मोठा अभिमान असतो.

नायजेरियाच्या नैर्ऋत्येला असलेलं इग्बो ओरा हे शहर मात्र एका वेगळ्याच कारणानं प्रसिद्ध आहे. हे शहर जगातील सर्वाधिक जुळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथे जगभरात सर्वांत जास्त जुळे लोक राहतात. एवढंच नव्हे, इथे दरवर्षी जन्माला येणाऱ्या जुळ्या मुलांची संख्याही जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे हे शहर गेल्या अनेक वर्षांपासून जगाच्या नकाशावर आपलं स्वतंत्र स्थान राखून आहे. या शहरात जवळपास प्रत्येक घरात एक तरी जुळं आहे. काही घरांत तर एकापेक्षाही जास्त जुळी मुलं आहेत. आपलं हे वैशिष्ट्य इथले लोक अर्थातच माेठ्या अभिमानानं मिरवतात. त्यामुळे दरवर्षी या जुळ्यांचा मेळावा इथे भरवला जातो.

यंदाचा हा बारावा मेळावा. या मेळाव्यात जुळ्यांनी अनेक करामती करून दर्शकांचे अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडले. नुकतीच जन्माला आलेली जुळी मुलं, शाळकरी, तरुण, मध्यमवयीन, वृद्ध... असे हजारो जुळे एकाच वेळी इथे पाहायला मिळाले. तब्बल एक हजारापेक्षा जास्त जुळे यंदाच्या मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्यात भाग घेण्यासाठी अगदी परदेशांतूनही अनेक जुळ्यांनी हजेरी लावली. रंगबिरंगी कपडे, चित्रविचित्र पोशाख, त्याचवेळी आपण इतरांपेक्षा एकदम हटके दिसावं, आपल्याकडेच लोकांचं पाहताक्षणी लक्ष जावं यासाठी अनेकजण वेगवेगळे फॅशनेबल पोशाख घालून इथे येतात. एकाच वेळी किती जुळे आणि त्यांच्या काय काय लीला पाहाव्यात, अशी अनेकांची अवस्था होते. शिवाय दोन्ही जुळे एकदम एकसारखे. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा असे त्यांचे पोशाखही एकसारखे. हा मेळावा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही हे जुळे बऱ्याचदा चकमा देतात आणि ‘तो मी नव्हेच’ म्हणून हात वर करतात! अर्थात हे सारं काही चालतं ते खेळीमेळीनं. 

इग्बो ओरा या शहराला जुळ्यांची जागतिक राजधानी म्हणून संबोधलं जातं. दर हजारात जवळपास पन्नास जुळी इथे आढळून येतात. संपूर्ण जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. याच ठिकाणी सर्वांत जास्त जुळे जन्माला का येतात, याबाबत संशोधकांनी बराच अभ्यास केला, हे गूढ हुडकून काढण्याचा प्रयत्न केला; पण अजूनपर्यंत तरी त्यांना त्यात यश आलेलं नाही. स्थानिक लोकांच्या मते मात्र इथे जगात सर्वाधिक जुळे जन्माला येतात; याचं कारण इथल्या महिलांचं वैशिष्ट्यपूर्ण खाणंपिणं. 

इग्बो ओरा येथील स्थानिक नेते सॅम्युएल अडेले यांच्या मते, येथील महिला भेंडीची पानं, आवळा, याशिवाय इतरही अनेक स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ खातात. यात गोनाडोट्रोपिन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो. यामुळे येथील महिलांना जुळी, तिळी मुलं होण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रजननतज्ज्ञ मात्र याबाबत साशंक आहेत. त्यांना हा तर्क मान्य नाही. त्यांच्या मते येथील महिलांना जुळी मुलं होण्याचं कारण म्हणजे आनुवंशिकता. 

या शहराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काही वर्षांपूर्वी जुळी मुलं जन्माला येणं इथे वाईट समजलं जाई. देवाच्या शापामुळे त्या संबंधित कुटुंबात जुळी मुलं जन्माला आली असं समजण्याचा प्रघात होता. त्यामुळे या कुटुंबाकडे थोडंसं नकारात्मक दृष्टीनंही पाहिलं जात असे. मात्र, काळाच्या ओघात हा समज पूर्णपणे बदलला आणि एखाद्या कुटुंबात जुळी मुलं जन्माला येणं म्हणजे देवानं दिलेला आशीर्वाद असं समजलं जाऊ लागलं. त्यामुळे लोकांचीही जुळ्यांकडे पाहाण्याची दृष्टी बदलली.

...आणि जुळ्यांना मिळाला उ:शाप! 

जुळ्यांच्या राजधानीमुळे आज इग्बो ओरा या शहराचं नाव जगात प्रसिद्ध आहे; पण पूर्वी याच शहरात जुळी मुलं जन्माला येणं म्हणजे पाप, देवाचा शाप समजलं जात असे. त्यामुळे या मुलांना एक तर मारून टाकलं जात असे किंवा त्यांना जंगलात सोडून दिलं जाई. ही प्रथा बंद करण्यात आणि जुळ्यांना उ:शाप मिळण्यात स्कॉटिश मिशनरी मॅरी स्लेसर यांचं योगदान खूपच मोठं आहे.

Web Title: Twins born in town of Igbo Ora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.