"मी 8 महिन्यांची गर्भवती, मला 9 महिन्यांचं बाळ आहे"; Twitter ने कामावरून काढल्यावर 'ती' म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:06 PM2022-11-05T15:06:51+5:302022-11-05T15:10:39+5:30
एलन मस्कने ट्विटरच्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 7500 ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
ट्विटरच्या भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. एलन मस्कने ट्विटरच्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 7500 ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये एक 8 महिन्यांची गर्भवती देखील आहे. ट्विटरच्या कंटेंट मार्केटिंग मॅनेजर रॅचल बॉन या महिलेने सोशल मीडिया अकाउंटवर सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी तिच्या लॅपटॉपवरील एक्सेस काढून टाकण्यात आला.
गुरुवारी संध्याकाळीच सर्व कर्मचार्यांना एका मेलद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. "आज एसएफ ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. मी 8 महिन्यांची गर्भवती आहे आणि मला 9 महिन्यांचे बाळ आहे. नुकताच लॅपटॉपचा एक्सेस काढण्यात आला आहे" असं म्हणत रॅचल बॉनने आपल्या मनातील व्यथा मांडली आहे. कंपनीने म्हटले आहे की, ते पुन्हा एकदा योग्य मार्गावर येण्यासाठी कठीण काम करत आहेत. कंपनी आपले जागतिक कर्मचारी कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे.
कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापूर्वी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले आहे. ट्विटरचे भारतात 300 कर्मचारी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे गेली आहे. तेव्हापासून कंपनीत अनेक बदल झाले आहेत. एका नवीन बातमीनुसार ट्विटरने 4 नोव्हेंबर रोजी भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्याचबरोबर इतर अनेक विभागांमध्येही फेरबदल करण्यात येत आहेत. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजता एक मेल केला आहे. ‘ट्विटरला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आम्ही ग्लोबल वर्कफोर्सला कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत. आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच ट्विटर सिस्टम आणि युझर डेटा साठी सर्व ऑफिसेस तात्पुरत्या स्वरुपात बंद करू. जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा जात असाल तर कृपया आपल्या घरी जा,’ असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.