Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरुच, आणखी तीन अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण..?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:44 PM2022-05-18T12:44:04+5:302022-05-18T12:45:26+5:30
Twitter News: काही दिवसांपूर्वीच सीईओ पराग अग्रवाल यांनी दोन अधिकाऱ्यांना काढून टाकले होते, त्यानंतर आता 3 अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
Twitter News:ट्विटर डीलनंतर कंपनीतील वाद हळूहळू वाढत चालला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक बडे अधिकारी कंपनीला राम-राम ठोकत आहेत. एकीकडे ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि इलॉन मस्क ट्विटरवर आमने-सामने आले आहेत, तर दुसरीकडे कंपनीतून कर्मचाऱ्यांच्या बाहेर पडण्याचा सपाटा सुरुच आहे.
इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरला 44 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्याची घोषणा केली. पण, ताज्या माहितीनुसार, मस्क यांनी हा करार सध्या होल्डवर ठेवला आहे. या दरम्यान, कंपनीतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांनी ट्विटर सोडण्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
तीन लोकांचा निरोप
रिपोर्ट्सनुसार, प्रोडक्ट मॅनेजमेंट फॉर हेल्थ, कन्वर्सेशन आणि ग्रोथच्या उपाध्यक्ष इल्या ब्राउन, ट्विटर सर्व्हिसेसच्या उपाध्यक्ष कतरिना लेन आणि डेटा सायन्सचे प्रमुख मॅक्स स्मायझर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. इलॉन मस्क यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे या सर्व अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. लेन आणि मॅक्स स्मायझरच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते दोघेही सुमारे दीड वर्षांपूर्वी ट्विटरशी जोडले गेले होते, तर इल्या ब्राउन गेल्या 6 वर्षांपासून ट्विटरशी संबंधित होत्या. कंपनीने या सर्वांच्या जाण्याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी दोन उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले होते.