अफगानिस्तानातून परतलेल्या 146 भारतीयांपैकी दोघांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 03:53 PM2021-08-23T15:53:45+5:302021-08-23T15:54:02+5:30
Afghanistan crisis : रविवारी भारतानं तीन उड्डाणांमधून दोन अफगाणी खासदारांसह 392 लोकांना परत आणलं.
काबूल:अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा केल्यानंतर भारत सरकार आपल्या नागरिकांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न करत आहे. 146 भारतीय नागरिक सोमवारी कतारच्या राजधानीतून चार वेगवेगळ्या विमानांनी भारतात दाखल झाले. या नागरिकांना अमेरिका आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) विमानानं गेल्या काही दिवसांत काबूलहून दोहा येथे नेण्यात आलं होतं. दरम्यान, यातील दोन प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
दोहाहून मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या दुसऱ्या तुकडीपैकी 104 लोकांना 'विस्तारा' विमानानं, 30 'कतार एअरवेज'नं आणि 11' इंडिगो 'विमानानं परत आणलं. अफगाणिस्तानच्या राजधानीतून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात रविवारी भारतानं तीन उड्डाणांमधून दोन अफगाणी खासदारांसह 392 लोकांना परत आणलं. दरम्यान, सोमवारी भारतात आलेल्या भारतीयांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे.