दोन प्राचीन भारतीय मूर्ती अमेरिकेत जप्त
By admin | Published: March 13, 2016 03:55 AM2016-03-13T03:55:04+5:302016-03-13T03:55:04+5:30
भारतातून चोरलेल्या दोन प्राचीन मूर्ती अमेरिकेतील प्रमुख लिलावगृहातून जप्त करण्यात आल्या आहेत. साडेचार लाख अमेरिकी डॉलर बाजारमूल्य असलेल्या या मूर्तींचा पुढील आठवड्यात लिलाव होणार होता.
वॉशिंग्टन : भारतातून चोरलेल्या दोन प्राचीन मूर्ती अमेरिकेतील प्रमुख लिलावगृहातून जप्त करण्यात आल्या आहेत. साडेचार लाख अमेरिकी डॉलर बाजारमूल्य असलेल्या या मूर्तींचा पुढील आठवड्यात लिलाव होणार होता.
आंतरराष्ट्रीय चौकशीनंतर वाळूच्या खडकापासून बनलेल्या या मूर्ती न्यूयॉर्क येथून जप्त करण्यात आल्या. भारत सरकार व ‘इंटरपोल’च्या मदतीने स्थलांतर आणि सीमा शुल्क अंमलबजावणी विभागातील गृहसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मूर्ती एशिया वीक न्यूयॉर्कमधील ख्रिस्तीज लिलावगृहाच्या ‘द लाहिरी कलेक्शन : इंडियन अॅण्ड हिमालयन आर्ट एइन्शट अॅण्ड मॉडर्न’ या प्रदर्शनात १५ मार्च रोजी लिलावासाठी ठेवण्यात येणार होत्या. यापैकी एक मूर्ती पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांची आहे. ही मूर्ती दहाव्या शतकातील असून ती राजस्थान किंवा मध्यप्रदेशातील असण्याची शक्यता आहे. या मूर्तीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य दीड लाख अमेरिकी डॉलर आहे. दुसरी मूर्ती आठव्या शतकातील असून त्यात रेवंता आणि त्यांचे शिष्य दाखविण्यात आले आहेत. या मूर्तीचे मूल्य तीन लाख अमेरिकी डॉलर आहे. आमच्या या कारवाईने आमचे बाजारावर, प्राचीन मूर्तींचे विक्रेते व खरेदीदार यांच्यावर लक्ष असल्याचे स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)