तुर्कीत भूकंपातून वाचलेली दोन बालके बनली आशेचा किरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 08:38 AM2023-02-09T08:38:43+5:302023-02-09T08:39:17+5:30
अरिफच्या शरीराचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. आपली सुटका व्हावी म्हणून तो आकांत करत होता.
अंकारा : तुर्कस्थान, सिरियामध्ये झालेल्या भयंकर भूकंपामुळे कोसळलेल्या शेकडो इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजून काही हजार लोक दबले असण्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यासाठी तुर्कस्थान, सिरियामध्ये मिळून सुमारे एक लाख सैनिक, स्वयंसेवक मदतकार्यात सहभागी झाले आहेत. तुर्कस्थानमधील कहरामनमरस या शहरात अरिफ खान नावाच्या ३ वर्षे वयाच्या बालकाची व आणखी एका शहरामध्ये १० वर्षांच्या बालिकेची इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली. त्यांच्या कहाणीमुळे भूकंपग्रस्ताच्या आयुष्यात आशेचा एक किरण निर्माण झाला आहे.
अरिफच्या शरीराचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. आपली सुटका व्हावी म्हणून तो आकांत करत होता. मदतपथकातील लोकांनी कडक थंडीपासून बचाव होण्यासाठी त्याच्या अंगावर ब्लँकेट पांघरले. ढिगारा उपसण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले. अरिफचे वडील इर्तुगुल किसी हे देखील या बचावकार्यात सहभागी झाले होते. सिमेट-क्राँक्रिटचे ढीग बाजूला काढून अरिफला जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
बेतुलचे प्राण वाचविले
- तुर्कस्थानात १० वर्षे वयाच्या बेतुल इदिस या बालिकेची मदतपथकाने ढिगाऱ्याखालून सुटका केली.
- मात्र अजूनही काही हजार लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
अर्भकाला केले अनाथ
- इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका अर्भकाचा रडण्याचा आवाज आला. त्याला बाहेर काढण्यात आले.
- त्याचे आईबाबा व कुटुंबातील सारे सदस्य मरण पावले आहेत. अख्खे कुटुंब भूकंपात गमावल्याच्या कहाण्या घराघरांत आहेत.
जगभरातून मदतीचा ओघ
भारताने सिरियाला सुमारे सहा टन इतक्या अत्यावश्यक गोष्टींची मदत केली आहे. विमानातून ही मदत त्या देशात रवाना करण्यात आली. याआधी भारताने तुर्कस्थानला ८९ डॉक्टरांचे वैद्यकीय मदतपथक पाठविले आहे. त्यांच्यासोबत क्ष-किरण यंत्र, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट अशा अनेक गोष्टी रवाना करण्यात आल्या होत्या.