कोपनहेगनमध्ये गोळीबारात २ ठार
By Admin | Published: February 15, 2015 11:59 PM2015-02-15T23:59:31+5:302015-02-15T23:59:31+5:30
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झालेल्या दुहेरी गोळीबारात दोन जण ठार व सहा जण जखमी झाले आहेत. यातील एक हल्ला इस्लामवर चर्चासत्र आयोजित करणाऱ्या सांस्कृतिक केंद्रावर झाला.
कोपनहेगन: डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झालेल्या दुहेरी गोळीबारात दोन जण ठार व सहा जण जखमी झाले आहेत. यातील एक हल्ला इस्लामवर चर्चासत्र आयोजित करणाऱ्या सांस्कृतिक केंद्रावर झाला.
कृदत्तोनदेन कल्चरल सेंटर या केंद्रात इस्लामवर मुक्त चर्चा आयोजित केली होती. या चर्चासत्रात प्रेषित मोहंमद यांचे वादग्रस्त रेखाचित्र काढणारा स्वीडीश कलाकार लार्स विल्कस सहभागी होणार होता. २००७ साली लार्सविरोधात संपूर्ण जगात निषेधाची मोहीम चालली होती. या हल्ल्यानंतर काही तासांनी कोपनहेगनच्या मुख्य सिनेगॉगमध्ये एका माणसाला डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. रविवारच्या पहाटे १ वाजता झालेल्या गोळीबारात दोन पोलीसही जखमी झाले. पहिल्या हल्ल्यात ५५ वर्षांचा एक माणूस मरण पावला व तीन पोलीस जखमी झाले. पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांतच हा हल्ला झाला आहे; पण या दोन्ही हल्ल्यांचा काही संबंध आहे काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डेन्मार्कच्या पंतप्रधान हॅले थॉर्निंग - श्मिड्ट यांनी सांस्कृतिक केंद्रातील गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)