दोन तास अख्ख्या शहराला वेठीस धरून लुटारूंनी घातला बँकेवर दरोडा; ब्राझिलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 12:32 AM2020-12-03T00:32:43+5:302020-12-03T00:32:57+5:30
पोलिसांनाही केले नामोहरम
रिओ दी जानेरिओ : ब्राझिलच्या क्रिसिमा शहरात एक डिसेंबरच्या मध्यरात्री दहा अत्याधुनिक गाड्यांमधून आलेल्या सुमारे ३० सशस्त्र दरोडेखोरांनी येथील एका बँकेतून इतकी मोठी रोख रक्कम लुटून नेली की, ती त्यांच्या गाड्यांमध्ये मावली नाही. त्यामुळे अनेक नोटा रस्त्यावर पडल्या होत्या. काही लोक त्या नोटा गोळा करताना दिसत होते. दरोडेखोरांनी दहशत पसरविण्यासाठी गोळीबार केला व सुरक्षा दलाच्या जवानांनाही नामोहरम केले. सुमारे दोन तास दरोडेखोरांनी या शहराला वेठीस धरले होते.
एखाद्या चित्रपटात शोभेल अशा थरारक पद्धतीने हा दरोडा घालण्यात आला. गोळीबाराच्या आवाजाने जागे झालेल्या क्रिसिमा शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या दरोडेखोरांनी बँकेची तिजोरी फोडताना स्फोटकांचा वापर केला. दरोडेखोर बँकेत घुसल्याची माहिती मिळताच पोलीस तसेच लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा लुटारुंनी त्यांच्यावरही गोळीबार केला. बँकेची तिजोरी फोडून तेथील रोख रक्कम आपल्यासोबत नेताना लुटारूंनी रस्त्यावरील काही लोकांना ताब्यात घेऊन आपली संरक्षक ढाल बनविले. त्यामुळे पोलिसांना दरोडेखोरांवर थेट प्रतिहल्ला करता आला नाही. त्यानंतर दरोडेखोर आपल्या कारमधून पसार झाले.
घराबाहेर न पडण्याची नागरिकांना सूचना
क्रिसिमा शहरात लूटमार चालू असताना एकाही नागरिकाने घरातून बाहेर पडू नये, अशा सूचना पोलिसांकडून दूरचित्रवाहिनी तसेच सोशल मीडियातून देण्यात येत होत्या. ब्राझिलमध्ये संघटित टोळ्यांनी पोलीस फौजफाटा कमी असलेल्या लहान शहरांमध्ये दरोडे घालण्याचे सत्र सुरू केले आहे.