दोन भारतीय पत्रकारांना पाक सोडण्याचे आदेश
By admin | Published: May 15, 2014 03:19 AM2014-05-15T03:19:59+5:302014-05-15T04:19:40+5:30
पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे.
इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे. ‘पीटीआय’चे स्नेहेश अॅलेक्स फिलिप आणि ‘द हिंदू’च्या मीना मेनन यांना पाकिस्तान सरकारने एक पत्र पाठवून त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात येत नसल्याचे कळविले आहे. हे दोन्ही पत्रकार गेल्या नऊ महिन्यांपासून राजधानी इस्लामाबादेत कार्यरत होते. भारत सरकार पाक सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान सरकार किंवा दिल्लीतील त्यांच्या उच्चायुक्तालयाने या घडामोडींची आगाऊ सूचना दिली नव्हती, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या दोन्ही पत्रकारांना २० मे पर्यंत देशातून जाण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून यासंदर्भात कोणतेही कारण दिले गेलेले नाही. पाक सरकारच्या या पावलानंतर भारत व पाकिस्तानात परस्परांचे पत्रकार नसण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे दिल्लीतील सरकारी सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था/ लोकमत न्यूज नेटवर्क)