अफगाणिस्तानात दुहेरी आत्मघाती हल्ला, ३७ ठार
By admin | Published: July 1, 2016 06:02 AM2016-07-01T06:02:13+5:302016-07-01T06:02:13+5:30
अफगाणिस्तानात पोलिसांच्या ताफ्यावर गुरुवारी केलेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यात ३७ ठार, तर ४० जण जखमी झाले.
काबूल : अफगाणिस्तानात पोलिसांच्या ताफ्यावर गुरुवारी केलेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यात ३७ ठार, तर ४० जण जखमी झाले.
काबूलपासून २० कि.मी.वरील पघमान जिल्ह्यात हा हल्ला झाला. पहिल्या हल्लेखोराने प्रशिक्षणार्थी पोलिसांना नेणाऱ्या दोन बसवर हल्ला केला, तर दुसऱ्याने पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणी मदतीसाठी धावलेल्यांना लक्ष्य केले.
मृतांत चार नागरिकांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी पोलीस वारदाक प्रांतातील प्रशिक्षण केंद्राहून काबूलला परतत होते.
गृहमंत्रालयाने हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देत मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितले. मात्र, हल्ल्याविषयी अधिक माहिती दिली नाही.
तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने हल्ल्याची जबाबादारी स्वीकारणारा ई-मेल वृत्तसंस्थेला पाठविला आहे. दोन आत्मघाती हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद अशरफ गणी यांच्या कार्यालयाने हा मानवतेवरील हल्ला असल्याचे सांगून हल्ल्याची गृहमंत्रालयामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. (वृत्तसंस्था)