"5 दिवसात दोन हजार कॉल", मिशन काबूल यशस्वी करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 03:17 PM2021-08-22T15:17:48+5:302021-08-22T15:18:01+5:30
Afghanistan Crisis: अफगाण स्पेशल सेलला गेल्या 5 दिवसांत दोन हजारांहून अधिक कॉल मदतीसाठी आले आहेत. तर 6 हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली:तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी भारतीय किंवा इतर परदेशी नागरिक कसे धडपडत आहेत याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की परराष्ट्र मंत्रालयानं स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलला गेल्या 5 दिवसात दोन हजारांहून अधिक कॉल आले आहेत. तर 6 हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की 1200 हून अधिक मेलला उत्तर देऊन अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत केली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण स्पेशल सेलला गेल्या पाच दिवसांत 2000 हून अधिक फोन आले आहेत. हा सेल अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय आणि इतर गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्हिसा, पासपोर्ट आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व आवश्यकतांची माहितीही दिली जात आहे.
मदतीसाठी येत असलेले कॉल फक्त काबूलमधूनच नाही तर अफगाणिस्तानच्या विविध भागातून येत आहेत. यात फक्त भारतीयच नाहीत, तर अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वाटत नसलेल्या अफगाणांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, रविवारी 250 पेक्षा जास्त प्रवासी ताजिकिस्तान आणि कतारची राजधानी दोहामार्गे काबूलहून भारतात पोहोचले. तर 168 प्रवासी विशेष हवाई दलाच्या विमानांद्वारे गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहेत. यापैकी 107 भारतीय नागरिक आहेत. तर 24 अफगाण नागरिक आहेत. त्यात दोन अफगाणिस्तानचे संसद सदस्य नरेंद्र सिंह खालसा आणि अनारकली आहेत.