अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 10:41 AM2018-12-06T10:41:28+5:302018-12-06T10:43:25+5:30
हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत.
टोकियो - हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात जपानच्या किनाऱ्यापासून 300 किमी अंतरावर झाला. या अपघातात सापडलेल्या एका एअरमॅनला वाचवण्यात यश आले आहे. मात्र अन्य नौसैनिकांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, अपघातात सापडलेल्या नौसैनिकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सी-130 विमानामध्ये पाच आणि एफ-10 विमानामध्ये दोन सर्विसमॅन तैनात होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातात सापडलेल्यांचा शोध घेण्यासाठी जपानने चार एअरक्राफ्ट आणि तीन जहाजे रवाना केली आहेत.
अमेरिकेच्या या दोन्ही विमानांनी इवाकुनी येथील मरिन कॉप्स एअर स्टेशनवरून उड्डाण केले होते. हे उड्डाण नियमित सरावाचा भाग होता. मात्र या उड्डाणादरम्यान अपघात झाला. आता या दुर्घटनेचा तपास सुरू आहे, अशीमाहिती अमेरिकी नौदलाने दिली आहे.