दोन महिला मंत्र्यांचा जपानमध्ये राजीनामा
By admin | Published: October 21, 2014 03:32 AM2014-10-21T03:32:37+5:302014-10-21T03:32:37+5:30
जपानमधील दोन कॅबिनेट महिला मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंतप्रधान शिन्जो अबे यांना दुहेरी धक्का बसला आहे.
टोकियो : जपानमधील दोन कॅबिनेट महिला मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंतप्रधान शिन्जो अबे यांना दुहेरी धक्का बसला आहे. या महिलांवर राजकीय निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. यामुळे अबे यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या मोहिमेला धक्का बसला आहे.
महिलांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे अबे यांची खूप प्रशंसा झाली होती; मात्र राजकीय निधीचा दुरुपयोग केल्याचे आरोप झाल्यामुळे उद्योगमंत्री युको ओबूची व विधिमंत्री मिदोरी मात्सुशिमा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळातील महिला सदस्यांची संख्या घटून तीन झाली आहे. अबेंनी सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळात पाच महिलांची नियुक्ती केली होती. अबे यांनी पत्रकारांना सांगितले की, या दोघींना मीच नियुक्त केले होते. पंतप्रधान म्हणून मी याची जबाबदारी स्वीकारतो आणि अशी परिस्थिती उद्भवल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. लवकरच नव्या मंत्र्यांची निवड करण्यात येईल. (वृत्तसंस्था)