दोन वर्षांच्या चिमुकल्याला खायला दिली केळी, अवघ्या 30 सेकंदातच आईच्या कुशीत झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 07:13 PM2021-12-19T19:13:38+5:302021-12-19T19:21:27+5:30
मुलाला वाचवण्याचा आईने खूप प्रयत्न केला, पण ती त्याला वाचवू शकली नाही.
आईच्या निष्काळजीपणामुळे तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा अवघ्या 30 सेकंदात वेदनादायक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना युनायटेड किंग्डममधील वेल्समध्ये घडली. महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलाला झोपण्यापूर्वी दुधाच्या बाटलीऐवजी केळी (Banana) खायला दिली. पण, केळी खाल्यानंतर अवघ्या 30 सेकंदातच बाळाचा मृत्यू झाला.
मुलाच्या गळ्यात अडकली केळी
नॉर्थ वेल्स लाइव्ह न्यूजच्या वृत्तानुसार, युनायटेड किंगडमच्या वेल्समध्ये राहणाऱ्या डॅनिएल बटरली नावाच्या महिलेने तिच्या बाळाला झोपण्यापूर्वी दुधाच्या बाटलीऐवजी केळी खायला दिली होती. यानंतर ती काही कामासाठी खोलीबाहेर गेली. अवघ्या अर्ध्या मिनिटातच ती खोलीत परत आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. परत आल्यावर तिला मुलाच्या गळ्यात केळी अडकलेली दिसली. केळी अडकल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. यावेळी तिने तात्काळ आपात्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली. पण, मदत यायला उशीर झाला.
अनेक प्रयत्न करुनही केळीचा तुकडा बाहेर आला नाही
महिलेने सांगितले की, मुलाचा आवाज ऐकून तो किती वेदनेत आहे, हे कळत होते. महिलेने त्याच्या गळ्यात अडकलेली केळी काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण, केळी बाहेर येण्याऐवजी अजून आत गेली. यावेळी तिने आपल्या बहिणीलाही मदतीसाठी बोलावले पण त्या सर्वांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि आईच्या कुशीतच तिच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, त्या चिमुकल्याचा मृत्यू हायपोक्सिक कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला.