Typhoon Shanshan : जपानमध्ये 'शानशान' वादळामुळे विध्वंस; ५० लाख लोकांना सोडावी लागली घरं, अनेकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:33 AM2024-08-30T10:33:41+5:302024-08-30T10:43:24+5:30
Typhoon Shanshan in Japan : जोरदार वारा आणि पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
जपानमध्ये 'शानशान' वादळाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. धोका लक्षात घेता, ५० लाखांहून अधिक लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे, कारण हे चक्रीवादळ ताशी २५० किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. सरकारने धोक्याच्या भागात अलर्ट जारी केला आहे. विमान आणि रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक भागात अडीच लाखांहून अधिक घरांची वीज गेली आहे.
जपानच्या हवामान संस्थेने सांगितलं की, क्यूशूच्या नैऋत्य बेटावर वादळ आल्याने कारखाने बंद पडले आणि शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. वादळाचा वेग ताशी २५० किलोमीटरवर पोहोचला आहे. काही भागात आधीच ७०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे, जो लंडनमध्ये संपूर्ण वर्षभर पडतो तेवढाच पाऊस आहे. गाड्या पलटी झाल्या आहेत आणि झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच अडीच लाख लोक विजेशिवाय जगत आहेत.
Typhoon Shanshan made landfall on the Japanese island of Kyushu earlier today.
— CIRA (@CIRA_CSU) August 29, 2024
The storm is expected to continue to impact Japan in the coming days with heavy rain and strong winds. pic.twitter.com/AbjTeo9KC1
जपानी मीडिया NHK नुसार, मध्य ऐची प्रांतामध्ये भूस्खलनामुळे एक घर कोसळून तीन लोकांचा मृत्यू झाला, तर पश्चिमेकडील तोकुशिमा येथे छत कोसळल्याने एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने असं सांगण्यात आलं की, टोकियोमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मेगुरो, नोगावा आणि सेंगावा नद्यांजवळील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्व सरकारी विभागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सध्या २१९ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सरकारने सांगितलं की, वादळामुळे ८ लाख लोकांना येथून इतर ठिकाणी पाठवलं जाईल. राजधानी टोकियोमध्ये बुलेट ट्रेन, ट्रेन, फ्लाइट आणि इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत.