संयुक्त अरब अमिरातींचा पर्यटन व्हिसा आता मिळणार पाच वर्षांसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:11 AM2020-01-08T04:11:41+5:302020-01-08T04:12:20+5:30
संयुक्त अरब अमिरातीने पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी कोणत्याही देशांच्या नागरिकांना पाच वर्षांचा पर्यटन व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुबई : संयुक्त अरब अमिरातीने पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी कोणत्याही देशांच्या नागरिकांना पाच वर्षांचा पर्यटन व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातून दरवर्षी काही लाख लोक दुबईला फिरण्यासाठी वा दुबई फेस्टिवल, तसेच खरेदीसाठी जात असतात. अशा मंडळींना आता दरवेळी नव्याने व्हिसा घ्यावा लागणार नाही.
या पाच वर्षांच्या व्हिसाच्या आधारे त्या देशात कितीही वेळा जाता येईल. संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती दुबई सरकारच्या माहिती विभागातर्फे देण्यात आली. त्यासाठी सध्याच्या व्हिसाविषयक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. ही सोय सर्व देशांतील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद रशीद अल मकतुक यांनी म्हटले आहे की, दरवर्षी दुबईत २ कोटी १० लाख पर्यटक येत असतात. दुबईत पर्यटन आणि खरेदी यासाठी भारत तसेच आशिया खंडातील लोकही तिथे जात असतात. संयुक्त अरब अमिरातीमध्ये काही लाख भारतीय राहत असून, त्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्याही मोठी आहे.
>शॉपिंग फेस्टिव्हलचे आकर्षण
दुबई शॉपिंग फेस्टिवल हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हा २६ डिसेंबर रोजी सुरू झालेला शॉपिंग फेस्टिवल १ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्या काळात सर्वाधिक पर्यटक तिथे जातात. येत्या आॅक्टोबरमध्येही दुबईमध्ये ‘एक्स्पो-२000’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा अधिक पर्यटक जातील, असा अंदाज आहे.