रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:22 PM2024-05-02T17:22:16+5:302024-05-02T17:23:09+5:30
UAE Rain Storm, Weather Live Updates: वादळी वारा आणि पावसानंतर यूएई प्रशासनाने देशभरात ऑरेंज अलर्ट जारी, विमानसेवेवरही परिणाम
UAE Weather Live Updates: सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हवामानाने हाहा:कार माजवला आहे. गुरूवारी पुन्हा या विभागात जोरदार वादळासह पाऊस झाला. वादळी वारा आणि पावसानंतर यूएई प्रशासनाने देशभरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाल्याचे चित्र आहे. आज सकाळी UAE च्या लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेकांना कार्यालयात जाणे शक्य झाले नाही. शाळकरी मुलांनाही या पावसाचा फटका बसला. अनेक वाहने रस्त्याच्या मधोमध पावसाच्या पाण्यात अडकल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून आले.
आधीच दिला होता इशारा- काही दिवसांपूर्वी यूएईच्या हवामान खात्याने हवामान खराब होण्याचा इशारा दिला होता. 2 मे ते 3 मे पर्यंत हवामान खराब होण्याची शक्यता आहे. यूएई सरकारने सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. शाळा आणि कंपन्यांना ऑनलाइन वर्ग घेण्यास आणि घरून काम करण्यास सांगितले आहे. उद्याने आणि समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. बस सेवा आणि विमान सेवांवरही परिणाम झाला आहे.
मध्यरात्रीपासून पाऊस सुरूच- नॅशनल सेंटर ऑफ मेट्रोलॉजी (एनएसएम) ने जारी केलेल्या अलर्टनुसार, मध्यरात्रीपासून देशात मुसळधार पाऊस पडत आहे. दुबईमध्ये पहाटे 2.35 वाजल्यापासून पाऊस आणि विजांचा कडकडाट झाल्याच्या बातम्या येत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसापेक्षा हा पाऊस कमी धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज व इतर वितरण सेवाही प्रभावित- UAE च्या खाद्यपदार्थ आणि तत्सम डिलिव्हरी सेवांनी देखील विलंब होत आहे. रायडर्सच्या सुरक्षेचा विचार करून त्यांच्या ग्राहकांना डिलिव्हरीसाठी विलंबाची नोटीस जारी केली जात आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या सेवाही रद्द केल्या आहेत. तसेच वीज वितरणसेवेवरही याचा परिणाम दिसून आला आहे.