उबरला 115 कोटी रुपयांचा दंड; ग्राहकांची दिशाभूल करणं पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:56 PM2022-12-07T13:56:47+5:302022-12-07T13:57:42+5:30
Uber Ride : उबरने आपल्या चुकीबद्दल ग्राहकांची माफी मागितली आहे.
Uber Ride : ग्राहकांची दिशाभूल आणि चुकीची चेतावणी दिल्यामुळे अमेरिकेतील रायडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी उबर (Uber) अडचणीत आली आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियन कोर्टाने कंपनीला जवळपास 115 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. राइड रद्द केल्यास शुल्क आकारण्याची धमकी दिल्याचा आणि काही प्रवाशांना भाडे वाढवून सांगितल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला होता. या प्रकरणी ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कंज्युमर कमिशनने (ACCC) उबरविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, ही दंडाची रक्कम एसीसीच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. तसेच, उबरने आपल्या चुकीबद्दल ग्राहकांची माफी मागितली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फेडरल कोर्टाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या राइड-शेअरिंग अॅपच्या ऑस्ट्रेलियन विंगने 2017 ते 2021 दरम्यान काही राइड्स रद्द केल्याबद्दल ग्राहकांना शुल्क आकारण्याची चेतावणी दिली आणि ऑगस्ट 2020 पर्यंत ऑफर केल्या जाणाऱ्या टॅक्सी सेवेचे भाडे निश्चित करण्यासाठी चुकीचे सॉफ्टवेअर अल्गोरिदम वापर करून ग्राहक कायद्यांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच कोर्टाने ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी 115 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
उबरने आपल्या वेबसाईटवर एका पोस्टमध्ये ऑस्ट्रेलियन युजर्सची माफी मागितली आहे. यामध्ये कंपनीने लिहिले की, आम्ही केलेल्या चुकांसाठी आम्ही ऑस्ट्रेलियन लोकांची माफी मागतो आणि संबंधित चिंतेच्या आधारे आम्ही आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये सक्रियपणे बदल केले आहेत. त्याचप्रमाणे, न्यायाधीश मायकेल ह्यू ओब्रायन यांनी लेखी निर्णयात म्हटले आहे की, स्मार्टफोन अॅपमध्ये चुकीची माहिती देऊन उबर ग्राहकांच्या राइड रद्द करण्यासंबंधी निर्णय बदलू इच्छित आहे.
एसीसीसी आणि रायडिंग अॅपने परस्पर कराराचा भाग म्हणून 143 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु न्यायाधीश मायकेल ह्यू ओब्रायन म्हणाले की, दोन्ही पक्षांनी सादर केलेले पुरावे 'एकूण अपुरे' आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या नुकसानीचा अंदाज लावता येईल. पुराव्यांवरून असे दिसून आले की, 0.5 टक्के उबर युजर्सना राइड रद्द करण्याच्या शुल्काच्या भीतीमुळे राइड्सवर जाण्यास भाग पाडले गेले.
उबर टॅक्सीच्या सॉफ्टवेअरने 86 टक्के भाडे वाढवले, परंतु उबरच्या 1 टक्क्यांहून कमी राइड्सने ही सेवा वापरली. तसेच एसीसीसीचे अध्यक्ष जीना कॅस-गोटलिब यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "दंड व्यवसायांना स्पष्ट संकेत देतो की, उत्पादन किंवा सेवेच्या किंमतीबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणे ही एक गंभीर बाब आहे, ज्यामुळे भरीव दंड होऊ शकतो."