उदिती जैन यांनी ब्रिटनमध्ये केले १२,५00 फुटांवरून स्कायडाइव्ह, अॅशफोर्डमध्ये सांत्वनगृह उभारण्यासाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:26 AM2017-09-29T01:26:50+5:302017-09-29T01:26:59+5:30
मूळच्या भारतीय असलेल्या उदिती जैन यांनी १२,५00 फूट उंचीवरून स्कायडाइव्ह करून प्रचंड धाडसाचे प्रदर्शन केले. ट्विंकलिंग स्टार प्रकल्पांतर्गत धर्मादाय निधी उभारण्यासाठी उदिती यांनी हा उपक्रम राबविला.
अॅशफोर्ड (ब्रिटन) : मूळच्या भारतीय असलेल्या उदिती जैन यांनी १२,५00 फूट उंचीवरून स्कायडाइव्ह करून प्रचंड धाडसाचे प्रदर्शन केले. ट्विंकलिंग स्टार प्रकल्पांतर्गत धर्मादाय निधी उभारण्यासाठी उदिती यांनी हा उपक्रम राबविला. ब्रिटनमधील केन्ट प्रांतातील अॅशफोर्ड येथे असलेल्या स्थानिक रुग्णालयातील एका प्रकल्पाच्या मदतीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
मुंबई येथून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची पदवी घेणा-या उदिती या किशोर दर्डा यांच्या कन्या आहेत. त्यांनी खामगाव येथील डॉ. सूचित जैन यांच्याशी विवाह केला. त्यानंतर १३ वर्षांपूर्वी हे दाम्पत्य इंग्लंडला स्थलांतरित झाले.
उदिती यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘गर्भात, बाळंतपणात अथवा जन्मानंतर थोड्याच अवधीत मृत्युमुखी पडणा-या बाळांच्या पालकांसाठी ‘सांत्वनगृह’ उभारणे अशी ट्विंकलिंग स्टार प्रकल्पामागील संकल्पना आहे. वैयक्तिक पातळीवर आपणही अशाच अनुभवातून गेलो असल्यामुळे हा प्रकल्प आपल्यासाठी हृदयाच्या अगदी जवळचा आहे.’’ ‘‘आपले बाळ गमावल्यानंतर पालकांना शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी कुठे तरी खाजगी परिसर मिळावा, ही या प्रकल्पामागील कल्पना आहे. बाळ गमावण्याच्या घटनेचा सामना करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी कोणताही सहज मार्ग उपलब्ध नाही. तथापि, या प्रकल्पातून शोकदग्ध पालकांना प्रसूती कक्षापासून दूर काही प्रमाणात खाजगीपण मिळेल,’’ असेही त्या म्हणाल्या. ‘‘स्कायडाइव्ह करताना तसेच निधी उभारताना आपण या कार्यात आपले छोटेसे योगदान देत आहोत, अशी माझी भावना होती,’’ असे उदिती यांनी म्हटले आहे.
स्कायडाइव्ह करतानाचा अनुभव कसा होता, या प्रश्नावर उदिती यांनी सांगितले की, ‘‘विमानात चढण्यापूर्वी आम्हाला सूचना आणि माहिती देऊन काय अपेक्षित आहे, हे सांगण्यात आले होते. तसेच सुरक्षाविषयक सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर माझ्या प्रशिक्षकाशी माझा परिचय करून देण्यात आला. तेही माझ्यासोबत उडी मारणार होते. त्यानंतर आम्ही कीट परिधान केले आणि आम्हाला घेऊन विमान १२,५00 फूट उंचीवर उडाले. योग्य उंचीवर पोहोचल्यानंतर मी सूचनेप्रमाणे पोझिशन घेतली. काही कळण्याच्या आतच मी उडी मारली. हा एक श्वास रोखून धरायला लावणारा अद्भुत अनुभव होता. मी जेव्हा उडी मारली तेव्हा केवळ माझ्या उपक्रमाचाच विचार करीत होते.’’