ऋषी सुनक ब्रिटनच्या निवडणुकीत पराभवाच्या छायेत? लेबर पार्टीला मोठी आघाडी; मतमोजणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 10:53 AM2024-07-05T10:53:26+5:302024-07-05T10:57:38+5:30
एक्झिट पोलनुसार, ६५० पैकी लेबर पार्टी ४१० जागा जिंकेल. आर्थिक मंदीचा सामना करूनही १४ वर्षे सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त १३१ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होताना दिसत आहे. मतमोजणी सुरू होताच, कीर स्टारमर यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीने सुरुवातीची आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलचे अंदाजही त्यांच्या बाजूने आहेत. दरम्यान, आता पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. स्वत: ऋषी सुनक यांनी पराभव स्वीकारला आहे.
आतापर्यंत ६५० पैकी २१३ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. लेबर पार्टीने १५९ जागा जिंकून आघाडी घेतली आहे.तर सुनक यांच्या पक्षाला फक्त २६ जागा मिळाल्या आहेत. इतरांनी आतापर्यंत २८ जागा जिंकल्या आहेत.
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
ब्रिटनचे शिक्षण सचिव गिलियन कीगन यांचा चिचेस्टरमध्ये लिबरल डेमोक्रॅट्सच्या उमेदवाराकडून पराभव झाला आहे. लिबरल डेमोक्रॅट्स १२,१७२ मतांनी विजयी झाले.
कट्टर उजव्या रिफॉर्म यूके पक्षाचे नेते निगेल फॅरेज विजयी झाले आहेत. फॅरेज यांनी क्लॅक्टन-ऑन-सीमध्ये निवडणूक जिंकली. याआधी त्यांना सात वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते. ब्रेक्झिट पक्षाचा उत्तराधिकारी असलेल्या अँटी इमिग्रेशन रिफॉर्म पार्टीला कंझर्व्हेटिव्ह आणि कामगार मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे.
एक्झिट पोलनुसार, ६५० जागांपैकी लेबर पार्टी ४१० जागा जिंकेल. आर्थिक मंदीचा सामना करूनही १४ वर्षे सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त १३१ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या निवडणुकीत भारतीयांनी कोणाला मतदान केले?
आकडेवारीवर नजर टाकली तर 2010 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 61 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला पाठिंबा दिला होता, फक्त 24 टक्के भारतीय कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या बाजूने होते. त्यानंतर, 2015 मध्ये 57 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला आणि 31 टक्के भारतीयांनी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान केले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत दोघांमधील फरक लक्षणीयरीत्या कमी झाला. 30 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला आणि 24 टक्के भारतीयांनी कंझर्व्हेटिव्हला मतदान केले होते.