CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सापडला कोरोनाचा नवा आणि धोकादायक स्ट्रेन; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं
By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 10:59 AM2020-12-22T10:59:25+5:302020-12-22T11:00:58+5:30
CoronaVirus News: नवा स्ट्रेन आढळल्यानं जगाची चिंता वाढली
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे. काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे संपूर्ण जग धास्तावलं आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन ७० पट अधिक धोकादायक आहे. हा विषाणू अतिशय वेगानं पसरत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्यानं अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
कोरोनाचा नवा स्ट्रेन म्हणजे नेमकं काय?
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला ब्रिटनच्या संशोधकांनी व्हीयूआय-२०२०१२/०१ असं नाव दिलं आहे. कोरोना विषाणूला अनेक टोक असतात. त्यातूनच तो माणसाला संक्रमित करतो. त्यानंतर त्याची साखळीच तयार होते आणि तो वेगानं पसरत जातो.
कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण
नवा स्ट्रेन कधी आणि कुठे सापडला?
बीबीसीच्या वृत्तानुसार, नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळून आला. नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये नव्या स्ट्रेननं बाधित झालेले काही रुग्ण सापडले. आतापर्यंत ११०० जणांना नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लागण झाली आहे.
आणखी कुठे कुठे आढळले रुग्ण?
ब्रिटनसह इटलीतही कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. फ्रान्समध्येही या स्ट्रेननं शिरकाव केलेला असू शकतो, अशी शक्यता तिथल्या सरकारनं वर्तवली आहे. ब्रिटनहून ऑस्ट्रेलियात परतलेल्या दोघांमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे.
सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम
नवा स्ट्रेन किती धोकादायक?
विषाणूमध्ये होणारे बदल नैसर्गिक आहेत. कोरोनादेखील त्याला अपवाद ठरलेला नाही. विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याच्या रचनेत बदल होत जातात. नव्या स्ट्रेनमुळे प्रादुर्भाव वेगानं वाढण्याची भीती आहे. हा स्ट्रेन ७० पट वेगानं पसरतो. त्यामुळे धोका अधिक आहे.
जगानं काय खबरदारी घेतली?
नवा स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी युरोपातील जवळपास सगळ्याच देशांनी ब्रिटनसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक बंद केली आहे. सर्वप्रथम फ्रान्सनं हा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सर्व सीमा बंद केल्या. यानंतर जवळपास दोन डझन देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानं रोखली.
आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा
भारतानं काय खबरदारी घेतली?
दोन डझन देशांनी ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक रोखल्यानंतर भारत सरकारनंदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला. आज रात्री १२ पासून ब्रिटनहून एकही विमानं भारतात येणार नाही. ३१ डिसेंबरपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू राहील. काल ब्रिटनहून भारतात दाखल झालेल्या आणि आज दाखल होणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल.
महाराष्ट्र सरकारनं काय पावलं उचलली?
ब्रिटन आणि मध्य पूर्वेतून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करून त्यांना १५ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर इतर देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नव्या स्ट्रेनवर लस प्रभावी ठरणार?
सुदैवानं कोरोनावरील लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरेल. वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर कोरोनाच्या रुपात काही बदल झाले. मात्र सध्या वापरात असलेल्या आणि संशोधनाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सगळ्या लसी नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरू शकतात.