आता सुनक vs. जॉन्सन! किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 01:41 PM2022-10-22T13:41:49+5:302022-10-22T13:42:26+5:30
UK next PM race: ट्रस यांची कारकीर्द केवळ सहा आठवड्यांची ठरल्यानंतर आता त्यांची जागा घेऊ इच्छिणाऱ्यांत किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
लंडन : माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे शुक्रवारी ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांची जागा घेण्याच्या संभाव्य दावेदारांमध्ये आघाडीवर होते.
ट्रस यांची कारकीर्द केवळ सहा आठवड्यांची ठरल्यानंतर आता त्यांची जागा घेऊ इच्छिणाऱ्यांत किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
ताज्या सर्वेक्षणानुसार, आगामी निवडणुकीत हुजूर पक्षाचा सुपडासाफ होण्याची शक्यता आहे. आता पुन्हा सहा वर्षांतील पाचव्या पंतप्रधानांची निवड होण्याच्या दिशेने हुजूर पक्षाची वाटचाल सुरू झाली आहे.
ट्रस यांना मिळू शकते तगडी पेन्शन
लिझ ट्रस काही आठवडेच पंतप्रधानपदी राहिल्या; परंतु त्यांना तगडी पेन्शन मिळणार आहे. राजकीय सार्वजनिक जीवनातील दैनंदिनी जपण्यासाठी म्हणून त्यांना पब्लिक ड्युटी कॉस्ट अलाऊंस (पीडीसीए) अंतर्गत तब्बल १ लाख १५ हजार ब्रिटिश पौंड मिळणार आहेत. ही योजना मागरिट थॅचर यांनी १९९१ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक पंतप्रधानांनी या योजनेतून तगड़ी कमाई केली आहे.
काय घडले 'त्या' रात्री ?
१) हुजूर पक्षाच्या खासदारांन फ्रँकिंगबद्दल मतदानासाठी बोलावले होते; परंतु प्रत्यक्षात तो ट्रस यांच्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव होता, असा भ्रम निर्माण झाला होता.
२) खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रतोदांनी (व्हिप) त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. अनेक खासदार विश्वासदर्शक ठरावाच्या विरुद्ध होते, त्यांना समजावून सांगण्याऐवजी मुख्य किंवा उपमुख्य प्रतोदांनी धमकावले.
3) खासदार ख्रिस ब्रायंट यांनी तर हुजूर पक्षाच्या खासदारांना मारहाण झाल्याचा दावा केला.