"ब्रिटनला माझी गरज, भारत दौऱ्यावर येऊ शकत नाही", बोरिस जॉन्सन यांचा मोदींना फोन
By मोरेश्वर येरम | Published: January 5, 2021 06:12 PM2021-01-05T18:12:51+5:302021-01-05T18:21:48+5:30
बोरिस जॉन्सन यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली.
नवी दिल्ली
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नियोजित भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बोरिस जॉन्सन यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासाठी यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.
"बोरिस जॉन्सन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे", असं जॉन्सन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
"कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रकोपामुळे काल रात्रीपासून देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. अशावेळी मी ब्रिटनमध्येच राहणं जास्त संयुक्तीक आहे. ब्रिटनला माझी गरज असून कोरोनाविरोधात लढा देणं महत्वाचं आहे", असं बोरिस जॉन्सन मोदींना फोनवर म्हणाले.
उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध याआधी प्रमाणेचं वृद्धींगत होत राहतील आणि कोरोनाच्या संकटात एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका अशीच कायम राहील, असंही जॉन्सन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.