थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 07:21 AM2019-01-17T07:21:43+5:302019-01-17T07:23:25+5:30

विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मे यांनी 19 मतांनी जिंकला

UK PM Theresa May survives no confidence vote | थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित

थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित

Next

लंडन: ब्रेक्झिट ठराव संसदेत मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव थेरेसा यांनी जिंकला. मजूर पक्षानं थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूनं 306 सदस्यांनी मतदान केलं. तर विरोधात 325 जणांनी मत नोंदवलं. त्यामुळे मे यांच्या सरकारवरचं संकट टळलं आहे. मात्र ब्रेक्झिटचं नेमकं काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी संसदेत प्रस्ताव आणला होता. त्यावर कनिष्ठ सभागृहात मतदान झालं. यात ब्रेक्झिट ठरावाविरोधात 432 सदस्यांनी कौल दिला. तर ब्रेक्झिटच्या बाजूनं 202 सदस्यांनी मतदान केलं. विशेष म्हणजे थेरेसा मे यांच्याच पक्षाचे 118 सदस्य विरोधात गेल्यानं पंतप्रधानांना मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. यानंतर विरोधात असलेल्या मजूर पक्षानं मे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा मतदान झालं. यामध्ये मे यांना 325 सदस्यांचा पाठिंबा मिळाला. तर 306 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे 19 मतांनी मे यांचं सरकार वाचलं. 

ब्रिटन 1973 पासून युरोपियन युनियनचा सदस्य आहे. 2016 मध्ये ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबद्दल जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 52 टक्के ब्रिटिशांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. त्यानंतर या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. युरोपियन युनियनमधून बाहेर पाडण्यासाठी ब्रिटनला 29 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र याबद्दलचा प्रस्ताव मे यांना अद्याप संसदेत मंजूर करुन घेता आलेला नाही. मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांच्यासह मे यांच्यासह मे यांच्या हुजूर पक्षातील अनेक खासदारांनी ब्रेक्झिट ठरावाविरोधात भूमिका घेतली आहे. 
 

Web Title: UK PM Theresa May survives no confidence vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.