"शेवट नाही ही तर सुरूवात..."; ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून ऐतिहासिक ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:00 AM2020-12-31T11:00:16+5:302020-12-31T11:02:55+5:30
Brexit Deal : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली करारावर स्वाक्षरी. दोन्ही सदनांच्या मंजुरीनंतर हे विधेयक ब्रिटनच्या राणीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे.
ब्रिटनच्या संसदेनं बुधवारी ब्रेक्झिट कराराला ७३ विरुद्ध ५२१ मतांनी मंजुरी दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघातून वेगळं होण्याअंतर्गत मुक्त व्यापार कराराला मंजुरी देण्यासाटी बुधवारी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. दरम्यान, बुधवारी जॉन्सन यांनी ब्रेक्झिट व्यापार करारावरही स्वाक्षरी केली.
"ज्या करारावर मी आता स्वाक्षरी केली तो शेवट नसून नवी सुरूवात आहे. माझ्या मते ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये आपले मित्र देश आणि सहकारी देशांसोबत नव्या संबंधांना सुरुवात होईल," असं बोरिस जॉन्सन ब्रेक्झिट करारावर स्वाक्षरी करताना म्हणाले. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीयन आयोगाच्या अधक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी यावर बुधवारी स्वाक्षरी केली. त्यानंतर हे दस्तऐवज रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी लंडन येथे आणण्यात आले.
युरोपियन युनियनपासून (ईयू) वेगळे होण्याअंतर्गत मुक्त व्यापार कराराला (एफटीए) संसदेची मंजुरी घेण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ख्रिसमसच्या सुट्टीनंतर बुधवारी संसदेचे अधिवेशन बोलावले होते. ब्रेक्झिटसाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीपूर्वीच झालेल्या सहमतीनंतर ८० पानांचं विधेयक ब्रिटनच्या संसदेत सादर करण्यात आलं. यापूर्वी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांनी यावर चर्चा केली. त्यानंतर हाऊस ऑफ लॉर्डमध्ये या विधेयकावर चर्चा करण्यात आली. दोन्ही सदनांच्या मंजुरीनंतर हे विधेयक ब्रिटनच्या राणीकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.