युक्रेन : सार्वमतास रशियाचा पाठिंबा
By admin | Published: May 13, 2014 04:48 AM2014-05-13T04:48:07+5:302014-05-13T04:48:07+5:30
युक्रेनच्या पूर्व भागातील फुटीरवाद्यांच्या सार्वमताला रशियाने रविवारी पाठिंबा जाहीर केला. या सार्वमतात नागरिकांनी स्वयंशासनाला कौल दिल्याचा बंडखोरांचा दावा आहे.
मॉस्को : युक्रेनच्या पूर्व भागातील फुटीरवाद्यांच्या सार्वमताला रशियाने रविवारी पाठिंबा जाहीर केला. या सार्वमतात नागरिकांनी स्वयंशासनाला कौल दिल्याचा बंडखोरांचा दावा आहे. अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांनी अवैध म्हणून, तर युक्रेनने फार्स संबोधत हे सार्वमत फेटाळून लावले आहे. रशियाने सार्वमताच्या परिणामांना पाठिंबा दर्शवितानाच युक्रेन सरकार आणि बंडखोरांना परस्परांशी चर्चा करण्याचेही आवाहन केले आहे. दुसरीकडे रशियावरील निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत विचार करण्यासाठी युरोपियन युनियनच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. डोनेटस्क आणि लुगान्सक येथील नागरिकांच्या इच्छेचा आपण सन्मान करतो, असे रशियाने एका निवेदनात म्हटले आहे. या सार्वमताच्या निकालाची अंमलबजावणी अत्यंत नागरी पद्धतीने व्हावी. यात हिंसाचाराच्या पुनरावृत्तीला थारा असू नये आणि युक्रेन तसेच डोनेटस्क, लुगान्सकच्या प्रतिनिधींमधील चर्चेद्वारे तो अमलात आणला जावा, असे आवाहन रशियाने केले आहे. हे सार्वमत अत्यंत घाईघाईने घेण्यात आले व यासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय निरीक्षक उपस्थित नव्हता. शीतयुद्धानंतर रशिया आणि पाश्चात्त्य देशांचे संबंध रसातळाला जाण्यास कारणीभूत ठरलेला युक्रेन पेच ताज्या सार्वमताने आणखी तीव्र बनला आहे. रविवारी झालेल्या सार्वमतात ८९ टक्के नागरिकांनी युक्रेनमधून फुटून निघण्याच्या बाजूने कौल दिल्याचे डोनेटस्क प्रांतातील एका फुटीरवादी अधिकार्याने सांगितले. लुगान्सक व इतर फुटीरवादी प्रांतातूनही असाच निकाल अपेक्षित आहे. या सार्वमताच्या निष्कर्षाला आपण अजिबात मान्यता देणार नसल्याचे अमेरिका, इतर पाश्चात्त्य देशांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था) रशियाने युक्रेनचे क्रिमिया बेट ताब्यात घेतल्यानंतर दोन महिन्यांनी हे सार्वमत घेण्यात आले. सार्वमतादरम्यान पूर्व युक्रेनच्या काही भागात हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्याचे वृत्त आहे. पूर्व भागात युक्रेनियन लष्कर सशस्त्र बंडखोरांविरुद्ध कारवाई करत आहे. सशस्त्र युक्रेन समर्थकांच्या एका गटाने रशिया समर्थकांच्या गर्दीवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. गोळीबारानंतर दोन जण जमिनीवर निश्चल पडल्याचे दिसून आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला किंवा काय हे लगेचच समजू शकले नाही, असे एका पत्रकाराने सांगितले. १० टक्के नागरिकांचा विरोध डोनेटस्क : युक्रेनच्या पूर्व भागातील डोनेटस्क शहरात रविवारी घेण्यात आलेल्या सार्वमतात ८९ टक्के नागरिकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मत टाकले, तर १० टक्के लोकांनी त्याच्या विरोधात मत दिले, असे बंडखोरांच्या स्वयंघोषित निवडणूक आयोगाने जाहीर केले. डोनेटस्कप्रमाणेच लुगान्सकमध्येही सार्वमत घेण्यात आले. त्याचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. युक्रेनच्या एकूण ४.६ कोटी लोकसंख्येपैकी ७० लाख नागरिक याच दोन भागात राहतात. या वादग्रस्त सार्वमतामुळे युरोपच्या पूर्व भागात यादवी उफाळू शकते, अशी भीती पाश्चात्त्य देशांना सतावत आहे.