Ukraine Crisis: युक्रेनमधील परिस्थिती बिघडली! भारताने आपल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिल्या देश सोडण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 10:14 PM2022-02-20T22:14:27+5:302022-02-20T22:22:46+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सरकारी लष्कर आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
युक्रेनमधील परिस्थिती बिघडतच चाचली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देशात परतण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सरकारी लष्कर आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दोन्ही बाजूंनी तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील हे वातावरण पाहता भारत सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
Families of Indian Embassy officials in Ukraine have been asked to move back to India: Sources pic.twitter.com/lM91EhGlKS
— ANI (@ANI) February 20, 2022
युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय राहतात
सध्या युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय नागरिक राहतात. यातील बहुतांश विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने तेथील नागरिकांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. रविवारी जारी करण्यात आलेल्या नवीन अॅडव्हायझरीमध्ये युक्रेनमधील सततची तणावपूर्ण परिस्थिती पाहता तेथे राहणाऱ्या सर्व भारतीयांना तात्पुरते युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
'सर्व देशांच्या कायदेशीर सुरक्षा हितांची काळजी घ्या'
भारताने याआधीही अनेकवेळा म्हटले आहे की, आपल्या नागरिकांची सुरक्षा प्रथम आहे. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीत बोलताना भारतीय राजदूताने सर्व देशांचे न्याय्य सुरक्षेचे हित लक्षात घेऊन तणाव तत्काळ कमी झाला पाहिजे, असे म्हटले होते. संपूर्ण प्रदेशात दीर्घकालीन शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यावरही त्यांनी भर दिला.
'संवादातून समस्या सोडवा'
UNSC बैठकीत भारताने मिन्स्क करार आणि नॉर्मंडी फॉर्मेट अंतर्गत वाटाघाटी सुरू करण्यास समर्थन दिले. भारतीय राजदूत म्हणाले, 'आमचा विश्वास आहे की मिन्स्क करार पूर्व युक्रेनवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक संवादासाठी आधार प्रदान करतो. सर्व बाजूंनी परस्पर मतभेद दूर ठेवून संवादाद्वारे सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'
मिन्स्क करारासाठी भारत आग्रही आहे
मिन्स्क करारामध्ये रशिया, युक्रेन, युरोप आणि OSCE यांचा समावेश आहे. करारामध्ये डोनेस्तक, लुहान्स्क आणि पूर्व युक्रेनमधील इतर प्रदेशांमध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर नॉर्मंडीच्या वाटाघाटींच्या स्वरुपामध्ये जर्मनी, फ्रान्स आणि मिन्स्क कराराचे सदस्य समाविष्ट आहेत. हे स्वरूप मिन्स्क कराराच्या योग्य अंमलबजावणीशी संबंधित आहे.