काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार; पाकला मोठा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:43 AM2019-09-12T02:43:43+5:302019-09-12T02:44:01+5:30
भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.
जीनिव्हा : काश्मीरच्या प्रश्नावरून भारतावर दबाव आणण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न पुन्हा अयशस्वी ठरले आहेत. काश्मीर प्रश्नाबाबत भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची विनंती धुडकावून लावून आता संयुक्त राष्ट्रांनी पाकला मोठाच दणका
दिला आहे.
भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर भारताने विनंती केली, तर मात्र आम्ही या प्रश्नात मध्यस्थी करू, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे. म्हणजेच काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानचे म्हणणे ऐकायलाच संयुक्त राष्ट्रांनी नकार दिला आहे.
महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची मध्यस्थीची विनंती फेटाळून लावलीच, पण त्यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक हेही म्हणाले की, मध्यस्थीविषयी संयुक्त राष्ट्रांची भूमिका कायम असून, त्यात बदल होण्याची शक्यताच नाही. दोन्ही देशांनी आपापसात चर्चा करून वाद मिटवावा, अशी आमची भूमिका असून, तसे पाकिस्तानला कळविण्यात आले आहे. काश्मीरबाबतचा वाद दोन्ही देशांनी चर्चा करूनच सोडवावा, त्यात आम्ही मध्यस्थी करणार नाही आणि त्याची आम्हाला गरज वाटत नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.