जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 11:47 AM2017-12-09T11:47:20+5:302017-12-09T11:56:38+5:30
डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले.
न्यू यॉर्क- डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. जेरुसलेमला अशी मान्यता दिल्यास मध्य-पूर्वेत तणाव वाढू शकेल अशी भीती अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेने जेरुसलमेला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर सुरक्षा परिषदेतील 15 पैकी 8 सदस्य राष्ट्रांनी याबाबत तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली होती. या देशांनी जगभरातील शांतता व सुरक्षेची स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त करत ही बैठकीची मागणी केली होती.
The UK position on status #Jerusalem is clear & longstanding: it should be determined through a negotiated settlement between #Israel & #Palestine. pic.twitter.com/kWpG3jWGjy
— UK at the UN 🇬🇧 (@UKUN_NewYork) December 8, 2017
जेरुसलेमच्या दर्जाबाबत पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यामधील वाटाघाटींमधूनच उपाय निघाला पाहिजे असे पाच युरोपीय देशांनी या बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जेरुसलेम ही इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोहोंची राजधानी असल्यामुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाटाघाटींनीच यावर वास्तवावादी तोडगा निघू शकतो. तसे झाल्याशिवाय युरोपियन युनियन जेरुसलेमच्या सार्वभौमत्त्वाला मान्यता देऊ शकत नाही असे या निवेदनात युरोपियन देशांनी स्पष्ट केले आहे.
US isolated at UN on #Jerusalem move https://t.co/1QGrMpU0Itpic.twitter.com/f5t6y92KCs
— CGTN (@CGTNOfficial) December 9, 2017
मात्र अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले यांनी अमेरिकेची बाजू बैठकीमध्ये जोरदारपणे मांडली. गेली अनेक वर्षे संयुक्त राष्ट्र हे इस्रायलचा द्वेष करणारे एक केंद्र बनलेले आहे. असे सांगत हॅले यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. तर बैठकीच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्राचे मध्य-पूर्वेतील विशेष प्रतिनिधी निकोलाय म्लादेनोव्ह यांनी अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या कृतीमुळे भविष्यातील धोक्याबाबत भीती व्यक्त केली. यामुळे हिंसक घटना घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.