संयुक्त राष्ट्राच्या दबावामुळे बांगलादेशबरोबर सुरु असलेल्या चर्चेवर परिणाम होईल- म्यानमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 01:23 PM2017-11-08T13:23:03+5:302017-11-08T13:28:11+5:30
संयुक्त राष्ट्राने काल घेतलेल्या भूमिकेमुळे पळून गेलेल्या 6 लाख रोहिंग्यांबद्दल बांगलादेशाशी चालू असलेल्या चर्चेवर परिणाम होईल अशी सूचक प्रतिक्रिया म्यानमारतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
ढाका- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने राखिन प्रांतामध्ये लष्कराद्वारे होणारी कारवाई आणि रोहिंग्यांवरील अत्याचार थांबविण्यासाठी दबाव वाढवल्यावर म्यानमारने आता नवी भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्राने पाठवलेल्या या निवेदनामुळे पळून गेलेल्या 6 लाख रोहिंग्यांबद्दल बांगलादेशाशी चालू असलेल्या चर्चेवर परिणाम होईल अशी सूचक प्रतिक्रिया म्यानमारतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये सुरु असलेली लष्करी मोहीम आणि राखिन प्रांतात रोहिंग्यावर होणारे अत्याचार ही अत्यंत काळजीची बाब असल्याचे मत सुरक्षा परिषदेच्या निवेदनामध्ये व्यक्त झाले आहे. यावर म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांनी हा प्रश्न म्यानमार आणि बांगलादेश यांच्यामधील द्वीपक्षीय संबंधातूनच सोडवला जाऊ शकतो, हा त्यांचा मुद्दा सुरक्षा परिषदेत दुर्लक्षित राहिल्याचे मत व्यक्त केले आहे. सू की यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये सुरक्षा परिषदेच्या कालच्या भूमिकेमुळे सध्या गतीमान आणि सुरळीत असणाऱ्या बांगलादेश आणि म्यानमारमधील चर्चेवर परिणाम होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अबुल हसन महमूद अली 16 आणि 17 नोव्हेंबर असे दोन दिवस रोहिंग्यांच्या प्रश्नावरील चर्चेसाठी म्यानमारला जाणार आहेत. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसनदेखिल 15 नोव्हेंबर रोजी म्यानमार दौऱ्यावर जाणार आहेत.
The crisis in Myanmar enters its 4th month. 800,000 Rohingya Muslims in desperate need of aid.
— CJ Werleman (@cjwerleman) November 7, 2017
International community does nothing. pic.twitter.com/DBX7a2sJEZ
संयुक्त राष्ट्राने म्यानमारवर दबाव टाकण्यासाठी काल काय केले होते?
म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्यांविरोधात सुरु असणाऱ्या हिंसाचाराला व गोंधळाच्या वातावरणाला तात्काळ शांत करावे असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने मंगळवारी म्यानमारला सांगितले होते. तसेच राखिनमधील लष्करी कारवाईलाही आता आवरते घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला. म्यानमार लष्कराच्या कारवाईमध्ये रोहिंग्यांवर हत्या, स्त्रियांवर बलात्कार, घरे जाळणे अशा प्रकारचे निषेध झाल्यामुळे त्याचीह तीव्र शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्राने निषेध केला आहे आणि रोहिंग्याच्या सुरक्षेप्रती काळजी व्यक्त केली. तसेच म्यानमार सरकारने राखिनमधील लष्करी कारवाई थांबवून तेथे कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी अशा सूचनाही केल्या आहेत. या निवेदनामध्ये मागच्या महिन्यात फ्रान्स आणि इंग्लंडने केलेल्या सुचनांचाही समावेश आहे.