रक्कामधील सीरियन नागरिकांचे रक्षण करा : संयुक्त राष्ट्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 02:36 PM2017-08-10T14:36:14+5:302017-08-10T14:43:18+5:30
रक्का शहरामध्ये दहा ते 25 हजार लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे शहर इसिसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. मात्र नक्की किती लोक तेथे अडकलेले आहेत याची माहिती तेथील युद्ध परिस्थितीमुळे स्पष्ट झालेले नाही
युनायटेड नेशन्स, दि.10- सीरियातील रक्का प्रदेशात अडकून पडलेल्या लोकांबद्दल काळजी व्यक्त करत संयुक्त राष्ट्राने या लोकांचे संरक्षण करण्याची विनंती तेथे लढणाऱ्या दलांना केली आहे. सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांनी लक्षात ठेवावी असेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
रक्का शहरामध्ये दहा ते 25 हजार लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे शहर इसिसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. मात्र नक्की किती लोक तेथे अडकलेले आहेत याची माहिती तेथील युद्ध परिस्थितीमुळे स्पष्ट होत नसल्याचे संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन डुजॅरिक यांनी सांगितले. सध्या रक्का येथे संयुक्त राष्ट्राला पोहोचण्यात अडथळे येत असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले. येथे अडकलेल्या लोकांना संरक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणिव आम्ही लष्करी दलांना करुन देतो आणि मानवतावादी दृष्टीकोनातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी देण्यात यावी असे स्टीफन यांनी स्पष्ट केले. जुलै महिन्यामध्ये रक्का प्रदेशातील 46 शहरांमध्ये राहणाऱ्या 2 लाख 63 हजार नागरिकांना मानवतावादी संघटनांनी अन्न, औषधे यांचे वाटप केले आहे.
इस्लामिक स्टेट विरोधात लढणाऱ्या सीरियन डेमोक्रॅटिक दलांनी रक्का शहरामध्ये दोन महिन्यांपुर्वी प्रवेश केला. पण इसिसच्या प्रखर विरोधामुळे त्यांना फारशी प्रगती करता आलेली नाही. रक्कामधील युद्धामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसला अमेरिकेने मदत पुरवली असून इसिसविरोधात लढण्यासाठी ही दले काम करत आहेत. अमेरिकेने या दलांना युद्धसामुग्रीही पुरवलेली आहे.
17 इंडोनेशियन नागरिक पुन्हा मायदेशी
रक्कामध्ये इसिसला मदत करण्यासाठी आलेले इंडोनेशियाचे 17 लोक पुन्हा घरी गेल्याची माहिती स्थानिक कुर्दी व्यवस्थेच्या प्रवक्त्याने दिली. या लोकांना सीरिया आणि इराकसीमेवर पाठवण्यात आले आणि तेथून ते पुन्हा इंडोनेशियाला गेल्याचे सांगण्यात आले.
2 आर्मेनियन कुटुंबांची सुटका
सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसनी (एसडीएफ) सात ख्रिश्चन कुटुंबांना रक्कामधून सुरक्षीत वाचवल्याची माहिती दिली असून त्यामध्ये 2 आर्मेनियन कुटुंबे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एसडीएफचे माहिती कार्यालयाचे संचालक मुस्तफा बली यांनी ही माहिती दिली आहे. रक्कामध्ये ख्रिश्चन समुदायही अल्प प्रमाणात राहातो.