अमेरिका, ब्रिटन इबोलाला रोखण्यासाठी सरसावले
By admin | Published: September 10, 2014 05:57 AM2014-09-10T05:57:58+5:302014-09-10T05:57:58+5:30
पश्चिम आफ्रिकेतील इबोला आजाराला रोखण्यासाठी अमेरिका व ब्रिटन तेथे वैद्यकीय साहित्य व सैनिक पाठविणार आहे.
मोनरोविया : पश्चिम आफ्रिकेतील इबोला आजाराला रोखण्यासाठी अमेरिका व ब्रिटन तेथे वैद्यकीय साहित्य व सैनिक पाठविणार आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाचे हजारो नवे रुग्ण येत्या काळात लायबेरियामध्ये समोर येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.
आतापर्यंतच्या नोंदीनुसार इबोलाचा सध्या झालेला हल्ला हा महाभयंकर आहे. गिनी येथून इबोलाची साथ सुरू झाली व ती सिएरा लिओन, लायबेरिया, नायजेरिया आणि सेनेगलमध्ये पसरली आहे. इबोलाने गेल्या आठ महिन्यांत २,३00 नागरिकांचा बळी घेतला आहे. इबोलाची सर्वाधिक लागण झालेल्या देशांमध्ये येत्या काळात नवे रुग्ण समोर येण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. इबोलावरील उपचारांसाठी नवे केंद्र सुरू करताच तेथे मोठ्या संख्येने रुग्ण येतात, त्यावरून हे लक्षात येते की, अंदाजापेक्षाही किती तरी जास्त रुग्ण आहेत, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
इबोलाची लागण आतापर्यंत ३५०० जणांना झाली असून त्यातील निम्मे रुग्ण हे लायबेरियातील आहेत. या आजाराने मोठ्या संख्येने मृत्यूही झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रुग्णांची मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगितले. इबोला रुग्णांवर उपचार करणाऱ्या मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या उपचारांसाठी लायबेरियाच्या राजधानीत लष्कराचे जवान २५ खाटांचे रुग्णालय सुरू करतील. स्थापनेनंतर रुग्णालयाची जबाबदारी लायबेरिया सरकारकडे सोपविली जाईल. अमेरिकेच्या या पुढाकाराचे लायबेरियाने स्वागत केले आहे. हे युद्ध एकट्या लायबेरियाचे नाही. हे युद्ध असे आहे की, सगळ्या जगाने यात गांभीर्याने एकत्र येऊन सर्व प्रकारचे सहकार्य केले पाहिजे, असे लायबेरियाचे सूचना मंत्री लेव्हिस ब्राऊन यांनी म्हटले. ब्रिटन लायबेरियात ६५ खाटांचे रुग्णालय स्थापन करणार आहे. या रुग्णालयाची व्यवस्था सैन्याचे अभियंते व वैद्यकीय कर्मचारी करतील. (वृत्तसंस्था)