पाकबाबत अमेरिकेची भूमिका अधिक कडक,अतिरेक्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:20 AM2017-10-08T02:20:52+5:302017-10-08T02:21:00+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काही आठवड्यांत आपले वरिष्ठ मुत्सद्दी आणि लष्करी सल्लागार यांना पाकिस्तानात पाठवून पाकिस्तानला जबर तंबी देणार आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काही आठवड्यांत आपले वरिष्ठ मुत्सद्दी आणि लष्करी सल्लागार यांना पाकिस्तानात पाठवून पाकिस्तानला जबर तंबी देणार आहेत. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेचे परराष्टÑमंत्री रेक्स टिलरसन हे याच महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानला जाणार आहेत. त्यापाठोपाठ संरक्षणमंत्री जीम मॅटीस पाकला रवाना होतील.
जिहादी गटांना पाठिंबा देणे तत्काळ थांबवावे, असा गंभीर इशारा अमेरिकेचे हे अधिकारी पाकिस्तानला देणार असल्याचे अमेरिकेनेच जाहीर केले आहे.
ट्रम्प यांनी या आधी म्हणाले होते की, आम्ही पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स देत आहोत. पाकिस्तान मात्र आम्ही ज्यांच्याशी लढत आहोत, त्या अतिरेक्यांनाच आश्रय देत आहे. मॅटीस यांनी याच आठवड्यात काँग्रेस सभागृहात सांगितले होते की, पाकिस्तानला समजावण्याचा आणखी एक प्रयत्न आम्ही करून पाहणार आहोत. (वृत्तसंस्था)