'या' दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला मिळणार 1 कोटी डॉलर्स, अमेरिकेने केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:59 PM2022-02-08T17:59:48+5:302022-02-08T17:59:56+5:30
अमेरिकेने ISIS-खोरासानचा म्होरक्यावर सनाउल्ला गफ्फारीवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेने इसिस-खोरासन(ISIS-Khorasan)चा म्होरक्या सनाउल्लाह गफारी आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची माहिती देण्याऱ्यास 1 कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ रिवॉर्ड्स फॉर जस्टिस (RFJ) ने त्याची अधिसूचना जारी केली.
अधिसूचनेनुसार, ISIS-K नेता शहाब अल-मुहाजिर, ज्याला सनाउल्लाह गफारी म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या माहितीसाठी अमेरिका $ 10 मिलीयन पर्यंतचे बक्षीस देऊ करत आहे. 26 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची माहिती देणऱ्यांनाही हे बक्षीस दिले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
गफारी हा ISIS-K चा नेता
RFJ च्या मते, अफगाणिस्तानमध्ये 1994 मध्ये जन्मलेला गफारी हा ISIS-K या दहशतवादी संघटनेचा नेता आहे. संपूर्ण अफगाणिस्तानातील सर्व ISIS-K ऑपरेशन्ससाठी निधी मंजूर करणे आणि व्यवस्था करण्याचे काम त्याच्याकडे आहे. काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी ISIS-K या अमेरिकेने प्रतिबंधित केलेली विदेशी दहशतवादी संघटना स्वीकारली असल्याचे आरएफजेने म्हटले आहे. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह किमान 185 लोक मारले गेले होते. ISIS-K च्या केंद्रीय नेतृत्वाने जून 2020 मध्ये गफारीला संघटनेचा नेता म्हणून नियुक्त केले.
ISIS ने घोषणा केली
अधिसूचनेत म्हटले आहे की, ISIS ने गफारीच्या नियुक्तीशी संबंधित घोषणेमध्ये, त्याला अनुभवी लष्करी नेता आणि काबुलमधील ISIS-K च्या 'शहरी सिंहांपैकी एक' असे वर्णन केले आहे. तो गनिमी व्यतिरिक्त अनेक जटिल आत्मघाती हल्ल्यांमध्ये सामील आहे. RFJ ने असेही ट्विट केले आहे की, सनाउल्लाह गफारी, ज्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस आहे, हा ISIS-K या दहशतवादी संघटनेचा सध्याचा नेता आहे. RFJ ला सिग्नल, टेलिग्राम, WhatsApp किंवा आमच्या टोर-आधारित टिप्स लाइनद्वारे सूचित करा, असे RFJ ने म्हटले आहे.