अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम, चंद्रावर जाणारी पहिली महिला असेल अमेरिकन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:29 AM2019-05-08T04:29:50+5:302019-05-08T04:31:37+5:30
अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले.
वॉशिंग्टन : अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले.
देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून येत्या पाच वर्षांत अमेरिका चंद्रावर परत जाईल आणि त्यावर पाऊल टाकणारी पहिली महिला व पुढील पुरुष अमेरिकेचा असेल, असे पेन्स यांनी येथे सॅटेलाईट २०१९ परिषदेत बोलताना सांगितले. ते म्हणाले, हे वर्ष संपायच्या आधी आम्ही अमेरिकेच्या अग्निबाणांवर अमेरिकन भूमीतून अमेरिकन अंतराळवीरांना अनंत पसरलेल्या अंतराळात पाठवणार आहोत याचा ट्रम्प प्रशासनाला आनंद होत आहे.
अंतराळातील गूढ आणि रहस्ये पूर्णपणे उलगडण्यासाठी माहिती व मार्गदर्शन मिळावे म्हणून ट्रम्प यांनी अमेरिकन सरकारच्या कार्यालयांबाहेर, नासाच्या पलीकडे बघितले पाहिजे हे मान्य केले आहे. याच कारणामुळे आम्ही नॅशनल स्पेस कौन्सिलमध्ये युझर्स अॅडव्हायझरीज ग्रुपला एकत्र केले आहे. मला सांगायला अभिमान वाटतो आहे की, अंतराळातील नवनवीन गोष्टी शोधण्यास गती देण्यासाठी देशातील अत्यंत बुद्धिमान व हुशार लोकांना एकत्र आणले आहे, असे माईक पेन्स म्हणाले.
भारतासह १०५ देशांतील प्रतिनिधी हजर
भारतासह १०५ देशांतील १५ हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि उद्योगांचे प्रतिनिधी सहा मेपासून वॉशिंग्टन डीसीमध्ये सुरू झालेल्या चार दिवसांच्या या परिषदेला उपस्थित आहेत. ही परिषद सगळ्यात मोठी अशी उपग्रह उद्योग घटना असल्याचे सांगण्यात येते. परिषदेत अॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस, स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, वन वेबचे संस्थापक गे्रग वायलर आदींची मुख्य भाषणे झाली.