जो बायडन यांच्या दावेदारीवर उपस्थित होताहेत प्रश्नचिन्ह, कमला हॅरिस यांना मिळू शकते संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:08 PM2024-07-11T13:08:24+5:302024-07-11T13:09:38+5:30
United States Presidential Election 2024: पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या निवडणुकीतील अभियानाला सध्या त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणावर आव्हान मिळत आहे.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्या अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान, पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निवडणुकीतील अभियानाला सध्या त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणावर आव्हान मिळत आहे. अनेक प्रमुख डेमोक्रॅट्स नेत्यांनी आगामी निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्र्म्प यांचा पराभव करण्याबाबतच्या बायडन यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अमेरिकन हाऊसच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी सांगितले की, ‘’आपली प्रचार मोहीम सुरू ठेवायची की नाही, याबाबत काय निर्णय घ्यायचा हे आता राष्ट्राध्यक्षांवर अवलंबून आहे’’. तर जो बायडन यांनी निवडणूक लढता कामा नये, असा सल्ला सेलिब्रिटी जॉर्ज क्लुनी यांनी दिला आहे. याशिवाय अनेक डेमोक्रॅटिक सिनेटर आणि खासदारांनी बायडन यांच्या विजयाबाबत शंका उपस्थित केली आहे.
अनेक डेमोक्रेटिक नेत्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून जो बायडन यांना हटवण्याची मागणी केली आहे. पहिल्या अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्यावर वरचढ ठरले होते. त्यानंतर जो बायडन यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जो बायडन यांच्या घटत्या लोकप्रियतेच्या रेटिंगमुळे डेमोक्रॅट्स चिंतेत आहेत. यापैकी काही लोकांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचं नाव पुढे आणलं आहे. मात्र हॅरिस यांनी याबाबत मौन बाळगलं आहे. तसेच त्यांनी जो बायडन यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.
कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सक्रियपणे विचार करत आहेत, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. कमला हॅरिस आपले संभाव्य सहकारी ठरू शकतील, अशा नावांवर विचारविमर्ष करत आहेत. दरम्यान, उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कपूर, केंटकीचे अँडी बेशर आणि पेनिसिल्वानियाच्या जोश शापिरो यांच्या नावांची कमला हॅरिस यांचे सहकारी म्हणून चर्चा सुरू आहे.