अमेरिकेने आमची काहीतरी इज्जत ठेवली पाहिजे - पाकिस्तान परराष्ट्रमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 05:36 PM2017-10-17T17:36:08+5:302017-10-17T17:40:00+5:30
अमेरिकेने मंगळवारी सलग दुस-या दिवशी पाकिस्तानच्या कबायली भागात ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
लाहोर - अमेरिकेने मंगळवारी सलग दुस-या दिवशी पाकिस्तानच्या कबायली भागात ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानात चौथ्यांदा ड्रोन हल्ला केला आहे. हक्कानी नेटवर्क विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. अफगाणिस्तानात नाटो सैन्य आणि भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यासाठी हक्कानी नेटवर्कला जबाबदार धरण्यात येते. दुस-या बाजूला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी अमेरिकेने पाकिस्तानची इज्जत ठेवली पाहिजे असे म्हटले आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी जियो न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी मंगळवारी सकाळी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील कबायली भागात हल्ले केले. सोमवारीही अमेरिकेने अशाच प्रकारची कारवाई केली होती. दहशतवाद्यांच्या निवडक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात 26 दहशतवादी ठार झाले तर 10 जखमी झाले.
हक्कानी नेटवर्कची मजबूत पकड असलेल्या भागामध्ये हे हल्ले करण्यात आले. अमेरिकेने अनेकदा पाकिस्तानकडे हक्कानी नेटवर्क विरोधात कठोर कारवाई करुन पुरावे देण्याची मागणी केली आहे. ड्रोन विमानामधून एकूण सहा क्षेपणास्त्र डागण्यात आली. जिथे हल्ले झाले त्या भागातून धुर येताना दिसत होता.
अमेरिकेने सोमवारी केलेल्या कारवाईत 14 दहशतवादी ठार झाले होते. यात दोन तालिबानी कमांडर होते. खुर्रम भागाच्या स्थानिक प्रशासनाने 26 जण ठार झाल्याच्या वृत्ताला दुजारो दिला. सलग दोन दिवस झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सरकार आणि तिथल्या राजकीय पक्षांमध्ये अमेरिकेबद्दल मोठी नाराजी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांततेसाठी आमची तालिबान आणि अन्य संघटनांशी चर्चा सुरु असताना अमेरिकेने असे हल्ले टाळायला हवे असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ म्हणाले. अमेरिकेने आमची इज्जत ठेवली पाहिजे असे ख्वाजा असिफ एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. दोन्ही देशांनी परस्परांचा सम्मान राखला, तरच संबंध सुधारतील असे असिफ म्हणाले.