ब्रह्मांड पोरके झाले!, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:35 AM2018-03-15T06:35:47+5:302018-03-15T06:35:47+5:30
विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवरांसंदर्भात मांडलेले सिद्धान्त व दुर्धर आजारावर मात करून विश्वासाठी संशोधनाचा यज्ञ अखंड चालू ठेवणारे जगप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बुधवारी केंब्रिज येथे अखेरचा श्वास घेतला आणि ब्रह्मांडच पोरके झाले.
लंडन : विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवरांसंदर्भात मांडलेले सिद्धान्त व दुर्धर आजारावर मात करून विश्वासाठी संशोधनाचा यज्ञ अखंड चालू ठेवणारे जगप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बुधवारी केंब्रिज येथे अखेरचा श्वास घेतला आणि ब्रह्मांडच पोरके झाले. ‘मोटार न्यूरॉन’ या आजाराचे निदान झाल्यानंतर वयाच्या २१व्या वर्षीच डॉक्टरांनी ते जास्तीत जास्त दोन वर्षे जगतील अशी भीती व्यक्त केली होती. पण त्यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यानंतर ५५ वर्षे आपल्या अगम्य विचारांतून जगाला नव्या संशोधनाची कवाडे खुली करून दिली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे वय ७६ होते. आॅक्सफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्रात प्रथम आल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. विश्वाची निर्मिती कशी झाली, कृष्णविवरे कशी तयार होतात, अशा गूढ प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हॉकिंग यांना आधुनिक काळातील ‘न्यूटन’ असे म्हटले जायचे.