इराणच्या विद्यापीठात अर्धनग्न फिरणाऱ्या तरुणीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, काय शिक्षा दिली? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:48 PM2024-11-20T14:48:47+5:302024-11-20T14:49:26+5:30
या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
Iran Court’s Order on Viral University Girl : इराणच्या तेहरान विद्यापीठात अर्धनग्न(अंडरगारमेंटमध्ये) फिरणाऱ्या अहो दरायी या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक करून तिच्यावर खटला दाखल केला होता. आज इराणच्यान्यायालयात या तरुणीच्या खटल्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्या विद्यार्थीनीची सुटका केली आहे. इराणच्या न्यायालयाने मंगळवारी (19 नोव्हेंबर) या प्रकरणाचा निकाल देताना तेहरान विद्यापीठात अंडरवेअर घालून फिरणाऱ्या विद्यार्थ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नसल्याचे सांगितले.
न्यायालयाने या निर्णयामागचे कारण दिले
न्यायालयाने निर्णय देताना कारण दिले की, अहाऊ दराई या विद्यार्थिनीने मानसिक आजारपणामुळे हे कृत्य केले आहे, त्यामुळे तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करू नये. न्यायपालिकेचे प्रवक्ते असगर जहांगीर म्हणाले, 'विद्यार्थिनीला रुग्णालयात पाठवण्यात आले आणि डॉक्टरांनी ती आजारी असल्याची पुष्टी केली. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थिनीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, तिच्यावर कोणताही न्यायालयीन गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
कौटुंबिक समस्यांमुळे तरुणी मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. विद्यार्थिनी आणि तिच्या सहकारी विद्यार्थ्यांच्या जवळच्या लोकांनीदेखील तिच्यामध्ये असामान्य वर्तनाची चिन्हे पाहिली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नोव्हेंबरच्या सुरुवातीला इराणमध्ये अहाऊ दराई नावाच्या विद्यार्थीनीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठात तरुणी फक्त अंडरगारमेंटमध्ये फिरताना दिसली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरात या व्हिडिओची चर्चा झाली.
त्या तरुणीने विद्यापीठ परिसरात इस्लामिक कपड्यांविरोधात निदर्शने केली होती. यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षांनी तिला रोखले आणि नंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. व्हिडिओ समोर आल्यानंतर ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने इराणच्या अधिकाऱ्यांना या विद्यार्थ्याची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले.