विमान कोसळल्याच्या चौकशीत युनोची मदत; नवे फुटेज जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:52 AM2020-01-16T03:52:57+5:302020-01-16T06:57:19+5:30
३० सेकंदांत दोन क्षेपणास्त्रे इराणने डागली
वॉशिंग्टन : युक्रेनच्या प्रवासी विमानाला (बोर्इंग ७३७) इराणची दोन क्षेपणास्त्रे ८ जानेवारीच्या रात्री धडकल्याचे व विमान ज्वाळांसह जमिनीवर कोसळल्याचे नव्या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसते. या घटनेत प्रवासी व विमान कर्मचारी असे १७६ जण ठार झाले. मृतांत बहुसंख्य हे इराणी व कॅनडाचे नागरिक होते.
अवघ्या ३० सेकंदांच्या अंतराने विमानावर ही दोन क्षेपणास्त्रे डागली. विमान जमिनीवर धाडकन आदळल्यामुळे विमानाच्या ट्रान्सपाँडरने काम करणे बंद केले. कारण ते पहिल्या क्षेपणास्त्रामुळे निकामी झाले. हे घडले ते दुसरे क्षेपणास्त्र सेकंदात धडकायच्या आधी, असे न्यूयॉर्क टाइम्सने (एनवायटी) म्हटले. एनवायटीने मंगळवारी सिक्युरिटी कॅमेरा फुटेजची खातरजमा करून घेतल्यानंतर हे वृत्त दिले. इराणच्या लष्करी ठिकाणापासून चार मैलांवरील खेड्याच्या छतावरून क्षेपणास्त्र डागण्याचे चित्रीकरण केले गेले. चित्रण अंधुक असून, त्यात किव्हला निघालेल्या या विमानाला आग लागली व ते तेहरान विमानतळाकडे परत फिरले व मिनिटांत स्फोट होऊन ते कोसळले, असे वृत्तात म्हटले. इराणच्या क्षेपणास्त्रांनीच हे विमान पाडल्याचा पाश्चिमात्य देशांचा दावा काही दिवस इराणने फेटाळून लावला होता
काही जणांना अटकही झाली
संयुक्त राष्ट्रे : युक्रेनचे प्रवासी विमान क्षेपणास्त्रांनी पाडले गेल्याच्या घटनेच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची हवाई संस्थाही सहभागी होणार आहे. इराणने या विमान कोसळण्याच्या घटनेची चौकशी सुरू करून काही लोकांना अटक केल्याचे मंगळवारी जाहीर केले होते.
आपल्या चौकशीत इराणने संयुक्त राष्ट्रांची मदत मागितली होती. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन आॅर्गनायझेशनने आम्ही इराणचे निमंत्रण मंगळवारी स्वीकारल्याचे निवेदनाद्वारे सांगितले.
चौकशीचा काही तपशील इराणच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला गेला असला तरी देशाचे अध्यक्ष हास्सन रौहानी दूरचित्रवाणीवर केलेल्या भाषणात म्हणाले की, अनेक तज्ज्ञांकडून तो तपशील पाहिला जाईल आणि न्यायपालिका विशेष न्यायालयाची स्थापना करील..