CoronaVirus News: कोरोनाबाधिताकडून किती वेळात होतो विषाणूचा फैलाव?; धक्कादायक माहितीनं चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:39 PM2020-07-16T20:39:44+5:302020-07-16T20:42:34+5:30
CoronaVirus News: ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समधील धक्कादायक प्रकार
कॅनबेरा: कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत अतिशय झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच आता कोरोना फैलावाचा वेग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांसह सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीकडून अवघ्या एका दिवसात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. देशानं कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. मात्र न्यू साऊथ वेल्समध्ये सापडलेल्या एका रुग्णामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, याची माहिती उपमुख्य वैद्यकीय अधिकारी मायकल किड्ड यांनी दिली नाही. मात्र या व्यक्तीच्या शरीरात सापडलेला कोरोना विषाणू अतिशय सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितलं.
संबंधित रुग्णाच्या शरीरात सापडलेला कोरोना विषाणू अतिशय वेगानं संक्रमित होत असल्याची माहिती किड्ड यांनी दिली. हा प्रकार असामान्य आहे. मात्र अशक्य नाही, असं त्यांनी सांगितलं. याबद्दलची माहिती देताना किड्ड यांनी सामान्य कोरोना विषाणू आणि न्यू साऊथ वेल्समधल्या शरीरातल्या कोरोना विषाणूची तुलना केली. 'सर्वसाधारणे कोरोनाची लागण झाल्यानंतर माणसाच्या शरीरात पाच ते सात दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं स्पष्टपणे दिसू लागण्याच्या एक ते दोन दिवस आधी त्याच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग सुरू होतो,' असं किड्ड यांनी सांगितलं.
न्यू साऊथ वेल्समध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या शरीरात आढळलेला कोरोना विषाणू वेगळा आहे. त्याच्या शरीरात शिरकाव केलेला विषाणू २४ तासांच्या आतच संपर्कात आलेल्यांच्या शरीरात प्रवेश करतो आणि मग फैलावाला सुरुवात होते, अशी माहिती किड्ड यांनी दिली. कोरोना विषाणूचं स्वरूप बदलत असल्याचा हा पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक व्यक्तीचं शरीर विविध पद्धतीनं कोरोनाला सामोरं जातं, हे यातून दिसून आल्याचं ते म्हणाले.