लसीकरण न झालेले व्यक्ती कोरोना व्हेरिअंट निर्मितीचे कारखाने ठरतील; रोग तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 03:11 PM2021-07-05T15:11:11+5:302021-07-05T15:14:11+5:30
कोरोना विरोधी लस न घेणारे व्यक्ती स्वत:चंच आयुष्य धोक्यात घालत आहेत. यासोबतच ते इतरांनाही मोठा धोका निर्माण करत आहेत, असं मत संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना विरोधी लस न घेणारे व्यक्ती स्वत:चंच आयुष्य धोक्यात घालत आहेत. यासोबतच ते इतरांनाही मोठा धोका निर्माण करत आहेत, असं मत संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोना विरोधी लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे लस घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
कोरोनाची लागण झालेले व्यक्ती हेच कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसाठीचा एकमात्र स्त्रोत आहेत. त्यामुळे लस न घेतलेले व्यक्तीच कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या उगमस्थानासाठीचे कारखाने ठरू शकतात, असा इशारा वंडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये संसर्गजन्य रोग विभागाचे डॉ. विल्यम शेफनर यांनी दिला आहे.
"कोरोना विरोधी लस न घेतलेल्या व्यक्तींचं प्रमाण जितकं अधिक तितकीच कोरोनाचा नवा व्हेरिअंटची निर्मिती होण्याची अधिक संधी आपण निर्माण करुन देत आहोत हे लक्षात घ्यायला हवं. अँटिबॉडिज नसलेल्या शरीरात कोरोनाची विषाणूचा शिरकाव होणं म्हणजे त्या व्हायरसचं म्युटेशन होण्याची शक्यता अधिक असते. यातून कोरोनाच्या आधीच्या प्रकारापेक्षाही अधिक भयानक प्रकार निर्माण होऊ शकतो आणि मोठं संकट ओढावू शकतं", असंही शेफनर म्हणाले.
कोरोना विषाणूचे व्हेरिअंट असे सहज तयार होत नाहीत. पण लसीकरण न झालेले व्यक्ती विषाणूचे व्हेरिअंट निर्माण होण्यासाठी संधी निर्माण करुन देतात. एकदा का व्हेरिअंटचा उगम झाला की तो एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत सहजपणे संक्रमित होतो. उलट संक्रमणाचा वेग आणखी वाढतो, असं मायक्रोबायोलॉजिस्ट आणि जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे सदस्य अँड्र्यू पेकोझ म्हणाले.