रोहिंग्या मुस्लिमांना अमेरिकेने केली 3.2 कोटी डॉलर्सची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 02:07 PM2017-09-21T14:07:12+5:302017-09-21T14:23:08+5:30
म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे.
वॉशिंग्टन, दि. 21- म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे. या मदतीतून संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्याप्रती अमेरिकेची बांधिलकी व्यक्त होते असे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना अमेरिकेच्या गृह विभागाचे प्रभारी सहाय्यक सरचिटणीस सायमन हेन्शॉव यांनी सांगितले. अमेरिकेच्या या मदतीमुळे इतर देशही रोहिंग्यांना मदत करण्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा सायमन यांनी व्यक्त केली.
म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांच्याशी अमेरिकेच्या गृह विभागाचे सचिव रेक्स टिलरसन यांनी चर्चा केल्यानंतर तसेच राखिन प्रांतामधील हिंसा रोखण्यासाठी सू की यांच्या सरकारने व्यक्त केलेल्या बांधिलकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले आहे. मानवाधिकाराचे झालेले उल्लंघन आणि हिंसा या विषयांकडे लक्ष द्यावे तसेच बाधित क्षेत्रातील गावे सोडून जाणाऱ्या लोकांना मानवतेच्या आधारावर मदत करावी अशी विनंती म्यानमार सरकार आणि लष्कराकडे टिलरसन यांनी केली आहे. या मदतीमुळे बेघर झालेल्या लोकांना तात्पुरती घरे, अन्नसुरक्षा, पोषक आहाराची मदत, मानसिक आधार, पाणी, स्वच्छता, हे लाभ होतील , तसेच 4 लाख लोकांना संरक्षण, मोडकळीस आलेल्या कुटुंबांची पुन्हा बांधणी, आपत्तीची भीती कमी करण्यासाठीही या निधीचा वापर होईल असे गृहविभागाने स्पष्ट केले. रोहिंग्यांना केलेल्या मदतीसह अमेरिकेने 2017 या आर्थिक वर्षामध्ये 9.5 कोटी डॉलर्सची मदत केल्याचे सायमन हेन्शॉव्ह यांनी स्पष्ट केले.
रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही - अाँग सान सू की
25 ऑगस्टपासून राखिन प्रांतात सुरु असलेल्या हिंसक हल्ले आणि लष्करी कारवाईमुळे 4 लाख 15 हजार रोहिंग्या, हिंदूंनी पलायन केले आहे. त्यातील लाखो लोक अत्यंत वाईट अवस्थेत उघड्यावर राहात आहेत. त्यांचे आरोग्य, सुरक्षा यांचा मोठा प्रश्न बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर निर्माण झाला आहे.