35 वर्षांनी सापडला हवाई दलाच्या कर्तव्याला कंटाळून पळून जाणारा अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:38 PM2018-06-13T12:38:13+5:302018-06-13T12:38:13+5:30
1983 साली नेदरलॅंडमधील कर्तव्य बजावल्यावर हा अधिकारी गायब झाला होता.
वॉशिंग्टन- 1983 साली अमेरिकेच्या हवाई दलातील नोकरी कोणालाही न सांगता सोडून गायब होणाऱ्या अधिकाऱ्यास पकड़ण्यात अमेरिकन तपास यंत्रणांना यश आले आहे. आपल्याला नैराश्य आल्यामुळे हवाई दलाची नोकरी सोडली होती असं या अधिकाऱ्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
विल्यम हॉवर्ड ह्युजेस ज्युनियर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमेरिकेच्या हवाई दलामध्ये तो कार्यरत होता. मात्र आता अटक होताना मात्र एका बनावट पासपोर्ट प्रकरणामुळे तो विशेष तपासणी पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका पासपोर्ट प्रकरणात चौकशी करताना विल्यमची ओळख पटली व त्याला अटक झाली.
विल्यम ह्युजेसने नोकरी सोडल्यानंतर तो बॅरी ओ बेईर्न या नावाने राहात होता. हवाई दलात काम करताना नैराश्य आले म्हणून त्याने नोकरी सोडली व खोट्या ओळखीने तो वावरु लागला. नोकरी सोडून कॅलिफोर्नियात स्थायिक झाल्याचे त्याने चौकशीमध्ये स्पष्ट केले आहे. तो आता 66 वर्षांचा आहे.
1983 साली त्याला नेदरलँडसमध्ये नाटोच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करण्यास सांगितले होते. तेथून परत आल्यावर त्याने नोकरीला रामराम केला आणि तो पसार झाला. तो न्यू मेक्सिको, अल्बुकर्क येथे 19 विविध ठिकाणांहून 28,500 डॉलर्स इतकी रक्कम काढताना शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्याची काहीच माहिती उपलब्ध झाली नाही. तो गायब झाल्यामुळे त्याला सोव्हीएट युनियन (रशिया) च्या एजंटसनी पळवले असावे अशी शंका सुरुवातीस घेतली गेली होती. त्याच्याकडे विशेष अशी कोणतीही महत्त्वाची माहिती नसल्याचे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.